काँग्रेसची शेट्टींसोबत गट्टी, साखर पट्ट्यातील राजकीय समिकरणे बदलणार ?

काँग्रेसची शेट्टींसोबत गट्टी, साखर पट्ट्यातील राजकीय समिकरणे बदलणार ?

कोल्हापूर – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. या दौ-यादरम्यान त्यांनी शिरोळमध्ये जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीमुळे काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीची चर्चा सुरू झालीय.

राजू शेट्टी भाजपवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे शत्रूचा शूत्र तो आपला मित्र या न्यायाने शेट्टी कधी काँग्रेससोबत तर कधी शिवसेनेसोबत गट्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र 2019 मध्ये दोघांपैकी एकाचाच पर्याय त्यांना निवडावा लागणार आहे. उद्धव ठाकरेंसोबत गट्टी केली आणि ऐनवेळी ते भाजपसोबत गेले तर पुन्हा फसगत व्हायची अशी भिती राजू शेट्टींना आहे. त्यामुळेच ते काँग्रेसोबत आघाडी करण्याच्या बेतात आहेत अशी चर्चा आहे. आजच्या अशोक चव्हाण यांच्यासोबतच्या भेटीने या चर्चेला बळकटी आली आहे.

काँग्रेससोबत शेट्टी गेल्यास हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टींना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मदत करु शकतात. दोन्ही पक्षांची त्या मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्याचा फायदा राजू शेट्टटींना होऊ शकतो. त्या बदल्यात शेट्टी यांची आघाडीला साखर पट्ट्यात चांगली मदत होऊ शकते. सांगली, कोल्हापूर, माढा, सोलापूर, अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा या ठिकाणी राजू शेटट्टींची काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मदत होऊ शकते. तसंच मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी स्वाभिमानीचे पॉकेट्स आहेत. तिथेही आघाडीला मदत होऊ शकते. तसाच फायदा विधानसभेला दोन्ही पक्षांना होऊ शकतो. तसंच अशा काळात एक मित्र मिळवल्याचा संदेशही काँग्रेस देऊ शकते.

COMMENTS