काॅंग्रेसचा नागपूर राजभवनाला घेराव

काॅंग्रेसचा नागपूर राजभवनाला घेराव

नागपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत आणि इंधनदरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आज काँग्रेसने नागपुरात राजभवनाला घेराव घातला. यावेळी शेकडो ट्रॅक्टरसह हजारो काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली मांडून भाकरी भाजून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर चौफेर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मोदींनी काळे कायदे आणून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचा विडाच उचलला आहे. शेतकरी 50 दिवसांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडीत आंदोलन करत आहेत. या कायद्यामुळे साठेबाजी, महागाई वाढणार, या कायद्यामुळे उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात नफेखोरीची मुभा मिळणार आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे काहीही नाही. पण केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. उद्योगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून हे कायदे बनवले आहेत. 50 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची थकित कर्ज माफ केली. अतिवृष्टी आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 10 हजार कोटींचे पॅकेज दिले.”

यावेळी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर मदत, पुनर्वसन आणि बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री बसवराज पाटील, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, खासदार बाळू धानोरकर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्य़ेने उपस्थित होते.

COMMENTS