दिवसभरात काँग्रेसला दुसरा धक्का, ‘या’ नेत्यानं दिला आमदारकीचा राजीनामा!

दिवसभरात काँग्रेसला दुसरा धक्का, ‘या’ नेत्यानं दिला आमदारकीचा राजीनामा!

मुंबई – दिवसभरात काँग्रेसला दुसरा धक्का बसला असून चंद्रकांत रघूवंशींपाठोपाठ ज्येष्ठ नेते अमरिश पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अमरिश पटेल हे काँग्रेसचे धुळे जिल्ह्यातील बडे नेते असून विधान परिषदेचे ते सदस्य आहेत. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित अशा श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे ते अध्यक्ष असून १९९० पासून चार वेळा ते शिरपूरमधून काँग्रेसतर्फे विजयी झाले आहेत. २००९ मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक काशीराम पावरा आमदार आहेत. पावरा यांच्यासोबत शिरपूरचे माजी नगराध्यक्ष आणि तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला. त्यामुळे आता अमरिश पटेलही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान उत्तर महाराष्ट्रमधील काँग्रेसचे बडे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनीही आज राजीनामा दिला आहे. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. गांधी परिवाराशी एकनिष्ठ कुटूंब म्हणून रघुवंशी परिवाराची ओळख आहे. गेल्या तीन टर्मपासून चंद्रकांत रघुवंशी विधानपरिषदेवर आमदार आहेत. परंतु
29 सप्टेंबरला काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये 4 जागांपैकी नंदूरबारच्या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. त्यात चंद्रकांत रघुवंशी यांच्या उमेदवारीचं चित्र स्पष्ट नसल्यामुळे ते शिवबंधन हाती बांधणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत रघुवंशी हे  शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी राजीनामा दिला असून बुधवारी दुपारी मातोश्रीवर ते पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS