नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या अडचणी वाढत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 100 वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या काँग्रेसची आज अनेक ज्येष्ठ नेते साथ सोडत आहेत. तेलंगण, कर्नाटक आणि गोव्यासारख्या राज्यांमध्येही अनेकांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यातच काँग्रेसवर कर्नाटकात सत्ता गमावण्याची वेळ आली आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या 79 आमदारांपैकी 13 आमदारांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारवर संकट ओढावले आहे. तर गोव्यातही चंद्रकांत कवळेकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या 10 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. तेलंगणमध्येही काँग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी पक्षाची साथ सोडून तेलंगण राष्ट्र समितीत प्रवेश केला. या घडामोडी घडत असतानाच काँग्रेसपुढं आर्थिक संकट येवून ठेपलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसवर आपल्या खर्चात कपात करण्याची वेळ आली आहे. पक्षाच्या अन्य विभागांना देण्यात येणाऱ्या निधीतही कपात करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस सेवादलाच्या मासिक खर्चात कपात करण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. यापूर्वी काँग्रेस सेवादलाला महिन्याला अडीच लाख रूपयांचा निधी देण्यात येत होता. आता त्यात कपात करून 2 लाख रूपये करण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त पक्षाने महिला काँग्रेस, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया आणि युवा काँग्रेसच्या खर्चातही कपात केली आहे. तसेच निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अद्याप वेतन मिळाले नसल्याची माहिती आहे. तसेच काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागातही आता 55 पैकी 35 जण कार्यरत आहेत. निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडिया विभागातील काही कर्मचाऱ्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही उशीराने वेतन मिळाले. त्यामुळे काँग्रेस पक्ष आता मोठ्या संकटात सापडला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS