पुणे – जनतेला मोठंमोठी आश्वासने देऊन व खोटी स्वप्ने दाखवून फसवणूक करणा-या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करण्यासाठी व काँग्रेस पक्षाची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढणार आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पुणे येथे काँग्रेस भवनात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे अंबाबाईचा आशिर्वाद घेऊन जनसंघर्ष यात्रेचा प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर पुणे या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. 7 सप्टेंबर रोजी पुणे येथे यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल. या यात्रेला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व इतर राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रण दिले आहे. त्यांच्या वेळेनुसार काँग्रेस अध्यक्षही या यात्रेत सहभागी होतील असे काँग्रेस खा. चव्हाण म्हणाले.
देशातले सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. सनातन संस्थेच्या साधकाच्या घरातून जिवंत बॉम्बचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कट्टरतावादी संघटना धुडगूस घालत आहेत. संपूर्ण देशात भितीचे वातावरण आहे.
न्यायालये आणि घटनात्मक संस्थांवर सरकारचा प्रचंड दबाव आहे. विविध संस्थावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत लोकांच्या नेमणुका करून या संस्था मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा वापर विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी सुरु आहे. माध्यमांची गळचेपी सुरु आहे. संपादक आणि पत्रकारांना नोकरीवरून काढण्यासाठी चॅनेलवर दबाव आणला जातो. सरकारविरोधात बोलणा-यांना देशद्रोही ठरवले जात आहे. महिला पत्रकारांना बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. देशात अघोषीत आणीबाणी आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
भाजप सरकारच्या काळात देशात 45 हजार आणि राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मंत्रालयाचे आत्महत्यालय झाले आहे. घोषणा करून एक वर्ष झाले पण अद्याप कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. पीक कर्ज नाही, पीक विमा नाही. गारपीट बोंडअळी, तुडतुडे यामुळे झालेल्या नुकसानीची मदतही दिली जात नाही. सरकारने शेतक-यांचे जगणे कठीण मरणे स्वस्त केले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किंमती रोज वाढत आहेत. जनता महागाईच्या वणव्यात होरपळत आहे असे खा. चव्हाण म्हणाले.
चिक्की घोटाळ्यापासून सिडकोच्या भूखंड घोटाळ्यापर्यंत भाजप सरकारने गेल्या साडेतीन वर्षात भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांशिवाय काहीच केले नाही. मुख्यमंत्री घोटाळेबाज मंत्र्यांना क्लीन चीट देत आहेत. उद्योगात कायम अग्रेसर राहिलेल्या महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये महाराष्ट्राची 13 व्या क्रमांकावर घसरण झाली. नोटाबंदी व जीएसटीच्या चुकीच्या पध्दतीने केलेल्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारत बेरोजगारांचा देश बनला आहे.
काँग्रेस सरकारने मराठा, मुस्लीम समाजाला दिलेल्या आरक्षणाचे रक्षण या सरकारने केले नाही. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ सांगितले शेकडो कॅबिनेट झाल्या अद्याप आरक्षण नाही. आरक्षणाचा प्रश्न चिघळवून राज्यात मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सर्व प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने विधिमंडळात आणि रस्त्यावर दोन्ही ठिकाणी लढा दिला आहे. हा लढा आणखी व्यापक करण्यासाठी काँग्रेस पक्ष जनसंघर्ष यात्रा काढून सरकारचे अपयश व चुकिचे निर्णय जनतेसमोर ठेवणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
या पत्रकारपरिषदेला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. विश्वजीत कदम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, रामकिसन ओझा उपस्थित होते.
COMMENTS