मुंबई – काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्याचबरोबर राज्यात काँग्रेसकडून चार कार्याध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. या चार नेत्यांची नावे समोर आली असून हर्षवर्धन पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसनं देशासह राज्यात बदल करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे राज्यात अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब थोरात तर कार्याध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांची नियुक्ती केली जाणार आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेसनं हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी पक्षांतर्गत बदल केले जात आहेत. कार्याध्यक्षपदाच्या निवडीवरुन काँग्रेसनं राज्यातील चहूबाजूंचा विचार केला असल्याचं दिसत आहे. कारण विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद विदर्भातील विजय वडेट्टीवार यांना दिलं आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने अहमदनगरला प्रदेशाध्यक्षपद दिलं जाणार आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षपदही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विचारपूर्वक दिलं असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे तरुण नेत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अमित देशमुख -लातूर, मराठवाडा
त्याचबरोबर मराठवाड्यातील काँग्रेसचे दिवंगतत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. मराठवाड्यात विलासराव देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे हे पद अमित देशमुख यांच्याकडे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
नितीन राऊत – नागपूर, विदर्भ
तर दुसरा कार्याध्यक्ष म्हणून नागपुरातील नितीन राऊत यांची नियुक्ती केली जाणार आहे. नितीन राऊत हे दलितांचा चेहरा म्हहणून ओळखले जातात. त्यामुळे दलित मतं वळवून घेण्यासाठी राऊत यांचा पक्षाला मोठा फायदा होऊ शकतो. याच उद्देशानं राऊत यांच्याकडे हे पद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
हर्षवर्धन पाटील – इंदापूर, पश्चिम महाराष्ट्र
तसेच इंदापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यावरही कार्यध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्यातील नावाजलेला चेहरा आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी पाटील यांचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे.
के. सी. पाडवी – अक्कलकुवा, उत्तर महराष्ट्र
तसेच के. सी. पाडवी हे उत्तर महराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहे. अक्कलकुवा मतदारसंघातून ते अनेकवेळा निवडून आले आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS