मुंबई – मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.
विविध ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील लोक आपापल्या गावी जाऊ शकणार असून अडकलेल्या लोकांना गावी पोहोचवण्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे. यासाठी एसटीच्या १० हजार बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मदत व पुनर्वसन विभाग याचा खर्च उचलणार असून यासाठी २० कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यात अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान एकीकडे परराज्यातील मजुरांना ट्रेनमधून पाठवताना ट्रेनच्या तिकिटाच्या पैशांवरून वाद असतानाच राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकार स्वतः तिकिटांचा भार उचलणार आहे. येत्या दोन दिवसात अमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी एसटीने मोफत जाता येणार आहे. राज्यातील मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यात नोकरदार, विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांची उपासमार होत आहे. त्यामुळे गावी जाऊ देण्याची मागणी या नागरिकांकडून केली जात आहे.अशातच राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परंतु याची अंमलबजावणी तातडीने होण्याची गरज आहे.
COMMENTS