कोरोना इफेक्ट – मुंबईत जमावबंदी  लागू, आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई !

कोरोना इफेक्ट – मुंबईत जमावबंदी लागू, आदेश न पाळणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई !

मुंबई – राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स बंद ठेवण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीचे आदेश (कलम १४४) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी लोकांना मोठ्या संख्येने एकत्र येता येणार नाही. हे आदेश न पाळणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यामध्ये सर्वात जास्त १५ रुग्ण पुण्यात असून मुंबई, नागपूर शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज औरंगाबादमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही महिला नुकतीच कझाकिस्तानमधून परतली होती.

कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले असून १५ मार्चपासून सर्वप्रकारच्या पर्यटन आणि बिझनेस टूर बंद करण्यात आल्या आहेत.

COMMENTS