मुंबई – उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषदेची मतमोजणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. उद्या त्या ठिकाणी मतमोजणी होणार होती. मतमोजणी केंव्हा होणार आणि कोणत्या कारणामुळे मतमोजणीला स्थगिती दिली याचा कोणताही उल्लेख निवडणूक आयोगाच्या आदेशात करण्यात आलेला नाही. उस्मानाबाद लातूर बीड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 1005 मतदारांनी 21 मे रोजी मतदान केलं आहे. त्याची मतमोजणी 24 मे ला उस्मानाबाद च्या तहसील कार्यालयात होणार होती. परंतु आता ही मतमोजणीच स्थगित केल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.
या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे. भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहिण भावांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे मुंडे विरुद्ध मुंडे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS