मुंबई – मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरातील ग्राहकांच्या तक्रारींचे संबधित यंत्रणेकडून विहीत वेळेत निराकरण होत नसेल तर त्यांनी ग्राहकमंचाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष तथा अध्यक्ष व नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा दिलीप शिंदे यांनी केले आहे. ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक आज आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, ग्राहकांना आपली तक्रार नोंदविण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या पोर्टलवरूनही तक्रार नोंदविता येते. त्याच प्रमाणे जिल्ह्यासाठी मुख्यालयस्थळी हेल्पलाईन सेवा असून त्याचा क्रमांक 22852814 असा आहे. तर टोल फ्री क्रमांक 18003001947 किंवा 1800222262 या क्रमांकावरही तक्रार नोंदविता येते. तसेच [email protected] या इमेलवरही ग्राहक तक्रार पाठवू शकतात.
ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात येते. यात शासकीय तसेच अशासकिय सदस्यांद्वारे ग्राहकांच्या तक्रारीसंदर्भातील अढावा घेतला जातो. आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील एम. टी एन एल या संस्थेद्वारा पुरविण्यात येणा-या सेवांसंदर्भात असलेल्या तक्रारी, शिधावाटप दुकानदारांकडून नियम पाळले न जाणे, तसेच वैद्यकीय सेवासंदर्भातील फसवणूक टाळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी कार्यकारी सदस्य तथा उपनियंत्रक शिधावाटप, मुंबई, ज्ञानेश्वर जवंजाळ यांच्यासह इतर शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
COMMENTS