दैनिक सामना झाला 30 वर्षांचा, ‘सामना’ हे नाव कसे मिळाले ?  वाचा हा लेख !

दैनिक सामना झाला 30 वर्षांचा, ‘सामना’ हे नाव कसे मिळाले ?  वाचा हा लेख !

बरोबर तीस वर्षापूर्वी सामना या दैनिकाची सुरूवात झाली आणि मराठी पत्रकारितेला एक नवे वळण मिळाले. परंतु सामना हे दैनिक सुरू असेच सुरू झाले नाही. व्यंगचित्रकार बाळासाहेबांनी मराठीत पहिले व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. त्यातूनच शिवसेना सारखी मोठी संघटना निर्माण झाली. ८०-९० च्या दशकात शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी एका दैनिकाची गरज बाळासाहेबांना वाटली आणि त्यातूनच सामनाचा जन्म झाला.

सामना नावाचा चित्रपट १९७५ साली येऊन गेला होता आणि या नावाने बाळासाहेंबाच्या नावात घर केले होते. आपल्या मुखपत्राचे नावही सामना असले पाहिजे हे बाळासाहेबांनी ठरवलेच होते. परंतु प्रश्न असा होता की, सामना नावाचे जिल्हापत्र आधीच सोलापूरमध्ये एक काँग्रेस कार्यकर्ते वसंत कानडे हे चालवत होते. पीआरबी कायद्यानुसार आपल्या दैनिकाचे नाव सरकारकडे नोंदणी करणे गरजेचे असते. त्यानुसार =वसंत कानडे यांनी सामना हे शीर्षक नोंदवून १० ऑक्टोबर १९७५ साली या वर्तमानपत्राची सुरूवात केली. सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते या वर्तमानपत्राचे उद्घाटन झाले होते.

बाळासाहेंबाना याबाबत कळाले की सामना या शीर्षकाची यापूर्वीच नोंदणी झाली आहे. सोलापूरमधील काही शिवसैनिकांनी कानडे यांच्यांशी संपर्क साधून बाळासाहेब सामना हे शीर्षक त्यांच्या मुखपत्रासाठी घेण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. सुभाष देसाई आणि राम भटकळ यांनी स्थानिक शिवसैनिकांशी संपर्क ठेवून या कामाचा पाठपुरावा केला. परंतु कानडे हे शीर्षक देण्यास राजी नव्हते. कानडे यांच्या पत्नींनी कानडे यांना राजी केले. शेवटी कानडे आपले शीर्षक देण्यास तयार झाले, परंतु त्यांनी एक अट बाळासाहेंबापुढे ठेवली. सामनाचा सोलापूरचा स्वतंत्र वार्ताहर असावा अशी अट ठेवली आणि बाळासाहेबांनीही दिलदार मनाने ती अट मान्य केली.

अखेर १२ ऑगस्ट १९८८ रोजी सोलापूरच्या न्यायालयात कानडे यांनी हे शीर्षक बाळासाहेबांना सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून सुपुर्द केले आणि म्हणाले “माझे मुल मी तुमच्या हवाली करत आहे, काळजी घ्या.” तुम्ही बाळासाहेंबाची मुंबईत भेट घ्या असा सल्ला राम भटकळ यांनी कानडेंना सल्ला दिला. त्यानुसार कानडे सपत्नीक मुंबईला गेले आणि बाळासाहेबांना भेटले. माँसाहेब मीनाताई ठाकरे यांनी त्यांचा सन्मानाने पाहुणचार केला.

काँग्रेसी विचारसरणीचे असले तरी कानडे यांचे लिखाण सामनामध्ये प्रसिद्ध होत होते. सामनाचे शीर्षक कानडे यांनी विकले अशी टीकाही त्यांच्यावर झाली. शेवटी वाजत गाजत २३ जानेवारी  १९८९ रोजी दादरच्या सावरकर स्मारकात बाळासाहेंच्या हस्ते दैनिक सामनाचा पहिला अंक निघाला. दैनिकाच्या प्रकाशनापूर्वी शिवसैनिकांनी जोरदार वातावरण निर्मिती केली. ‘दैनिक नव्हे सैनिक’ हे घोषवाक्य त्यांनी राज्याच्या घराघरात पोहोचवले.

सामना सुरू करताना बाळासाहेब म्हणाले, “आता वृत्तपत्राचे शस्त्र हातात घेऊन आम्ही ‘सामना’ सुरू केला आहे. पण गरज पडली तर आम्ही हातात खरी शस्त्रे घेऊन लढाई करू” ज्यांनी सामना शीर्षकाला जन्म दिला त्या वसंत कानडेंचा २००२ साली कर्करोगाने मृत्यू झाला. शिवसेना आणि सामनाला जन्म देणार्‍या बाळासाहेबांचा २०१२ साली प्राणज्योत मालवली. आज वसंत कानडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभाशिर्वादात सामनाची घौडदोड सुरू आहे.

पत्रकार तुषार  ओव्हाळ यांनी हा लेख लिहिला आहे.

COMMENTS