दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव, कोणी घेतली संपत्ती?

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव, कोणी घेतली संपत्ती?

मुंबई – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा आज लिलाव झाला. दाऊदचे मुंबईतले घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊससाठी चर्चगेटमधल्या इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात इच्छुकांनी बोली लावली. सैफी बुऱ्हानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (SBUT) या संस्थेने इब्राहिमच्या तीनही संपत्ती घेतल्या आहेत.

सीबीआयने परकीय चलन आणि गुन्हेगारी संपत्ती कायद्यांतर्गत आतापर्यंत दाऊदच्या मुंबई आणि मुंबईबाहेरील अशा एकूण १० प्रापर्टी जप्त केल्या आहेत. ज्यामधील ३ गोष्टींचा आज लिलाव झाला. भेंडी बाजार येथील याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील ५ घरे आणि हॉटेल रौनक अफरोज यांचा यात समावेश आहे.

दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत १२ जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवली होती. इच्छुकांनी बंद लिफाफा, स्वत: उपस्थित राहून किंवा ई – ऑक्शनमध्ये सहभागी होऊन बोली लावली. दाऊदच्या डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई या घराचा लिलाव झाला. या घराची सुरुवातीची किंमत १ कोटी ५५ लाख ७६ हजार आहे. हॉटेल रौनक अफरोजची  सुरुवातीची किंमत १ कोटी १८ लाख ६३ हजार आहे. तर शबनम गेस्ट हाऊसच्या लिलावाची सुरुवातीची किंमत १ कोटी २१ लाख ४३ हजार आहे.

मागील लिलावात दाऊदची हिरव्या रंगाची कार स्वामी चक्रपाणी यांनी  32,000 रुपयांत खरेदी केली होती. यानंतर ही कार दहशतवादाचं प्रतीक असल्याचं सांगत गाझियाबादमध्ये ती पेटवून दिली होती.

याआधीही दाऊदच्या संपत्तीच्या लिलावासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. २०१५ मध्ये दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. पत्रकार बालाकृष्ण यांनी दाऊदच्या रौनक अफरोज हॉटेल लिलावात खरेदी केले होते. पण ३० लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित ४ कोटी रुपये त्यांना देता आले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेलचा लिलाव होणार आहे.

आधीदेखील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. मात्र दाऊदचे इतर नातेवाईक यांनी धमक्या देऊन लिलावात सामील झालेल्यांना मालमत्ता मिळू दिली नसल्याचे समजते.

COMMENTS