लातूर – विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज ऐनवेळी मागे घेणारे रमेश कराड यांच्याबाबत योग्य तो निर्णय विधानपरिषद निवडणुकीनंतर घेतला जाईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. रमेश कराड हे सध्या राष्ट्रवादीतच असून त्यांना पक्षातच ठेवायचे आहे की पक्षातून त्यांची हकालपट्टी करायची आहे याबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक रमेश कराड यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेचं तिकीटही देण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि धनंजय मुंडे यांच्यावर नामुष्की ओढावली होती.
राज्यात एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यावर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे निकालानंतर पक्ष काय ठरवणार आहे ते आपल्याला कळवण्यात येईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. लातूर येथील विधानपरिषदेच्या उमेदवाराच्या प्रचार बैठकीदरम्यान ते बोलत होते.
COMMENTS