नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आज दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. परंतु काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले असून माकन यांनी राजीनामा दिला नसल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. अजय माकन यांनी तीन वर्षांपूर्वी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपादाचा कार्यभार स्वीकारला होता. अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने अजय माकन यांच्याकडे दिल्लीची धूरा सोपवली होती.
दरम्यान प्रकृती अस्वास्थ्यामुळे अजय माकन हे परदेशात उपचारासाठी गेले असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. अजय माकन यांनी गेल्या महिन्यातच पक्षनेतृत्वाला राजीनाम्याची कल्पना दिली होती. त्यांनी दिल्लीतील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपवल्याची माहिती आज समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळीही अजय माकन यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे आता त्यांनी राजीनामा दिला असेल तर पक्षनेतृत्व तो स्वीकारणार की नाही हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS