चलनातील 99.30 टक्के पैसा पुन्हा परत आला. त्यामुळे नोटबंदी फसल्याचं उघड झालं आहे. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक हरी नरके यांनी नोटबंदीच्या प्रकरणावरुन जोरदार उपहासात्मक टोलेबाजी केली आहे. त्यांच्या फेसबूक वॉलवरुन घेतलेली ही पोस्ट आम्ही जशीच्या तशी देत आहोत.
नोटाबंदी २००% यशस्वी – प्रा.हरी नरके
रू.५०० नी १०००च्या सर्व नोटा परत आल्याने नोटाबंदी फसली असे आरोप केले जातायत.
एक अर्थतज्ज्ञ तर म्हणाले, डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही, निघाले निव्वळ एक मेलेले झुरळ. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लागली. रोजगार कमी झाले. उद्योग, व्यापाराचे तीनतेरा वाजले, इ. इ. मला हे आरोप मान्य नाहीत.
नोटाबंदीचे अनंत लाभ झालेले आहेत.
१. नोटा बंदीमुळे बॅंक कर्मचार्यांची कार्यक्षमता वाढली. पुर्वी ते कामच करीत नव्हते. नोटाबंदीच्या काळात २४-२४ तास काम करू लागले. आरबीआयवाल्यांना दोन वर्षे नोटा मोजायचे काम मिळाले.एरवी बेकार बसून पगार खातात. त्यांना हाताने नोटा मोजाव्या लागल्याने त्यांचे बेरीज-वजाबाकीचे गणिताचे ज्ञान वाढले.
२. नोटाबंदीमुळे जनतेला आनंद मिळाला.
जुन्या नोटा जमा झाल्या. नव्याकोर्या नोटा जनतेला मिळाल्या. किती स्तुत्य उपक्रम. नव्याकोर्या नोटांचा आनंद बघा ना! त्याही कोणताही ज्यादा चार्ज न घेता.
३. नोटाबंदीमुळे बेरोजगारांविषयीची संवेदनशीलता वाढली.
नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांच्या नोकर्या गेल्या. बरेच झाले ना. नोकरीच्या सुरक्षिततेमुळे ते बेपर्वाईने वागत होते. बेकारांचे, बेरोजगारांचे दु:ख काय असते ते यामुळे त्यांना कळले तरी.
नोकर्या गेल्यावर त्यांना नोकरीचे महत्वही कळले. मी तर म्हणतो, सध्या जेव्हढे लोक सरकारी/खाजगी नोकरीत आहेत त्यांनाही धक्का द्याच. देशात संवेदनशीलता वाढणे गर्जेचे आहे.
४. नोटाबंदीमुळे देशाची लोकसंख्या कमी झाली.
नोटा बदलीसाठी ग्रामीण – शहरी दोन्ही भागातल्या जनतेला बॅंकांच्या दारात रांगा लावायला लागल्या. त्यात काहीशे लोक मृत्यूमुखी पडले. बरेय ना! तेव्हढीच देशाची लोकसंख्या कमी झाली. मी तर म्हणतो, दरवर्षी असे ड्रील घेत जा. शिवाय लोक कामचुकार झाले होते. त्यांना असे कामाला लावणे गरजेचे होतेच.
५. नोटाबंदीमुळे पं. प्र. यांच्याविषयीची आत्मियता वाढली.लोकांची निर्णयशक्ती वाढली.
आपले पंप्र. दररोज २२ तास काम करतात. राहिले तुम्ही दोनचार महिने रांगेत उभे तर असे काय बिघडले? नोटाबंदीमुळे सलग चार महिने त्यांना भारतातच रहावे लागले. किती हा त्याग. त्यामुळे भारतीय जनतेला त्यांचा सहवास मिळाला.
लोक काय दोन्ही बाजूंनी बोलतात. एकदा म्हणतात, नोटाबंदीमुळे काम गेले, एकदा म्हणतात कामाला लावले. एक काय ते नक्की करा.
६. नोटाबंदीमुळे गरीबी दूर झाली.
ज्यांनी ४०% कमिशनवर जुन्या नोटा बदलून द्यायचा “शाही उद्योग” केला त्यांची गरीबी हटली की नाय? हुआ की नयी?
७. नोटाबंदीमुळे केरळच्या पूरग्रस्तांना रू. दहा हजारची घसघसीत मदत मिळाली.
नोटाबंदी झाली नसती तर ८५० कोटी रूपयांची उलाढाल असणारी पेटीएम कंपनी तयार झाली असती? तिच्या मालकाने केरळ पूरग्रस्तांना रू. दहा हजारची घसघसीत मदत केली असती?
८. नोटाबंदीमुळे राष्ट्रीय एकात्मता वाढली.
लोक एका रांगेत महिना महिना उभे होते. त्यांच्यात भाईचारा वाढला. एकमेकांना इतक्या जवळून समजून घेता आले.
९. नोटाबंदीमुळे संगणक-मोबाईल साक्षरता आणि श्रीमंती वाढली.
नोटाबंदी ना होती तर इ. व्यवहार न वाढते. ते वाढल्याने काही श्रीमंत कंपन्यांना चार्जेस मिळू लागले. त्यांची श्रीमंती आणखी वाढली.
१०. नोटाबंदीमुळे सिक्युरिटी प्रेसला छपाईचे काम मिळाले.
एरवी नुस्ते बसून पगार खायचे लेकाचे. नोटांचा आकार लहान झाल्याने एटीएम मशिन्स दुरूस्त करावी लागली. तंत्रज्ञांना काम मिळाले.
११. नोटाबंदीमुळे वाहिन्यांना खाद्य मिळाले. अर्थक्रांती झाली.
वाहिन्यांना चर्चा करायला विषय मिळाले. बोकील अनिलाण्णा नावाचे जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ यामुळेच जगाला मिळू शकले.
१२. नोटाबंदीमुळे रोजगारात भरीव वाढ झाली.
नोटाबंदीविरूद्ध लोकमत तयार होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर प्रचारक नेमले गेले. त्यांना रोजगार मिळाला. सरकारने जाहीराती दिल्या. प्रिंट आणि इ.मिडीयाला रेव्हेन्यू मिळाला.
लेखकांना मसाला मिळाला. फेबुविरांना काम मिळाले.
१३. नोटाबंदीमुळे आतंकवाद खतम झाला.
जुन्या नोटा वापरून आतंकी कारवाया व्हायच्या. नव्या नोटा आल्यापासून काश्मीर किती शांतय!
मुख्य म्हणजे पाकने छापलेल्या सगळ्या जुन्या नोटा वाया गेल्या. आपल्या शत्रूचे नुकसान म्हणजे आपला फायदाच.
हुआ की नयी?
नोटाबंदीचे असे १०१ फायदे आहेत. तुर्तास एव्हढेच.
तर बोला नोटाबंदी २००% यशस्वी झालेली आहे….नव्हे मान्य करा. तशा पोस्टी टाका.
-प्रा. हरी नरके, २९ ऑगष्ट, २०१८
COMMENTS