भाजपचे नाराज आमदार आज उद्धव ठाकरेंना भेटणार !

भाजपचे नाराज आमदार आज उद्धव ठाकरेंना भेटणार !

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण कोकणातील नाणार प्रकल्पावरुन प्रचंड तापलं आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. पुढे काय होईल याचा नेम सांगता येत नाही. अशातच भाजपचे विदर्भातील नाराज आमदार आशिष देशमुख हे आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी साडेसहा वाजता मातोश्रीवर ही भेट होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला स्थानिक आणि भाजप वगळता सर्वच पक्षांचा विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प विदर्भात करावा अशी मागणी  आशिष देशमुख यांनी केली होती. याचसंदर्भात देशमुख हे ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून आशिष देशमुख भाजपवर नाराज आहेत. शेतकरी कर्जमाफी असो किंवा वेगळा विदर्भाचा मुद्या देशमुख यांनी फडणवीस आणि भाजपला अडचणीत आणण्याची आणि त्यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडलेले नाही. आता नाणारवरुन भाजप शिवसेनेचे संबंध कमालीच ताणले गेलेले असताना आणि शिवसेनेचा प्रकल्पाला तीव्र विरोध असताना देशमुख ठाकरे भेट होत आहे. हा प्रकल्प कोकणातील जनतेला नको आहे. त्यामुळे तो विदर्भात न्यावा अशी मागणी करुन मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू आहे. याला आता भाजप कशाप्रकारे उत्तर देतं ते पहावं लागेल.

COMMENTS