नागपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात भाजपला खडेबोल सुनावले. सावरकर यांच्या मुद्यापासून ते गोवंश हत्याबंदी कायद्यावरही त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांच्या या भाषणानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विसरले होते की, ते विधानसभेत आहेत म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील भाषण केले. या सरकारने आज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकही घोषणा केली नाही. पहिल्याच अधिवेशनात या सरकारने दिलेले वचन पाळले नाही म्हणून आम्ही सभात्याग केला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री उत्तर देतील त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय काढला नाही. त्यासोबतच मराठा आरक्षण अशा मुद्द्यांनाही त्यांनी बगल दिली. उद्धव ठाकरेंनी वचन दिले होते की शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देऊ पण त्यांनी काही मदत केलेली नाही. हे विश्वासघातकी सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिले मुख्यमंत्री असतील ज्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर काही उत्तरे दिलेले नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
COMMENTS