अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

मुंबई – उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.अर्थमंत्र्यांच्या नावाखाली अर्थमंत्र्यांचं जाहीर सभेतील भाषण आम्ही ऐकलं. हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वल पोकळ भाषण, त्याव्यतिरिक्त काहीच नाही. पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये केवळ भाषण होतं, कुठलीही आकडेवारी नव्हती. आर्थिक स्थितीबाबत कुठलंही विश्लेषण नव्हतं. मागील वर्षाचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स नव्हता. ज्यासाठी आर्थसंकल्प मांडतात, तेच यात नव्हते अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. मुदतकर्जाबाबत कोणतीही घोषणा नाही. पीक कर्जाशिवाय काहीच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणारच नाही, असंही फडणवीस म्हणाले.

तसेच प्रचंड मोठी आर्थिक तूट असून ती यावर्षी अधिक वाढणार आहे. त्याबाबत काहीच उल्लेख नाही. अर्थसंकल्पाचा बॅलन्स पाहायला मिळाला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थमंत्र्यांना आणि सरकारला विसर पडलाय की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे महाराष्ट्रातच आहेत. मात्र या तीनही विभागांना या अर्थसंकल्पात काहीही दिलं नाही. कोकणाचं नाव घेतलं,  मात्र विदर्भाचं नावही घेतलं नाही अशी टीकाही त्यांनी केली.

मराठवाडा वॉटरग्रीड हा आमचा महत्त्वाचा प्रकल्प 20 हजार कोटींचा होता, मात्र या सरकारकडून केवळ 200 कोटींची तरतूद केली आहे.  आम्ही सिंचनासाठी जी योजना आणली होती, त्यामध्ये कोकणातून वाहून जाणारं 168 टीएमसी पाणी उचलायचं ते पाणी गोदावरी खोऱ्यात आणून, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करायचं. पैणगंगा-नळगंगा प्रकल्पातून विदर्भाला दुष्काळमुक्त करायचं होतं. याचा उल्लेखही अर्थसंकल्पात नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तसेच पेट्रोलवर 1 रुपया अधिभार लावला आहे. मात्र त्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडणार आहे. कारण पेट्रोल महागल्याने वाहतूक महागणार, मालवाहतूक महागणार, ट्रॅक्टरसह सर्व वाहतुकीवर परिणाम होईल, असं फडणवीस म्हणाले.

COMMENTS