मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सायकल मोर्चा काढला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी टिका करत हा निव्वळ फार्स आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पेट्रोल दर असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असं म्हणत फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचं गणित मांडून दाखवलं.
फडणवीस यांनी इंधन दरवाढीचे गणित मांडत असताना सांगितले की, राज्यामध्ये स्वतः पेट्रोल आणि डिझेलवर 27 रुपये कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा एकूण कर 33 रुपये आहे. त्यामध्ये चार रुपये हे कृषी सेस, तर चार रुपये डीलर कमिशन आहे. उर्वरित पैशांपैकी 42 टक्के पैसे केंद्र सरकार राज्यांना परत करतं. राज्य सरकारने मात्र 27 रुपये कर पेट्रोल-डिझेलवर लावलेला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
मला असं वाटतं की नाना पटोले यांचं आंदोलन हे राज्य सरकारविरोधात असावं. 27 रुपयांचा टॅक्स कमीत कमी करावा किंवा इतर राज्यांप्रमाणे किमान दहा रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त करावं, यासाठी त्यांचं आंदोलन असावं, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना लगावला.
COMMENTS