मुंबई – भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टोला लगावला आहे. हे सरकार खोटं बोल पण रेटून बोल करत आहे, देशातील ३३ टक्के कोविड रुग्ण महाराष्ट्रात आहेत. ४० टक्के कोविड मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत, पण हे मंत्री स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. देशात कोविडच्या जेवढ्या टेस्ट केल्या त्यामध्ये ५ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत. राज्यात ही टक्केवारी १३ टक्के तर मुंबईत त्यापेक्षा जास्त आहे. मुंबईत कोविड टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. अजूनही मुंबईत एम्ब्यूलन्स मिळत नाही. रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जात नाहीत, त्यावर राज्य सरकार काहीच बोलत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील आरोपांवर एवढ्या बैठका घेतल्या, अशा बैठका जर इतर वेळी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचं भलं झालं असतं. खरं तर सत्य बोलायला एकच माणसू लागतो, पण फेकफाक करायला ३ माणसं लागतात, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
२ किंवा ३ रुपये दराने दिला जाणारा गहू हा अन्न सुरक्षा योजनेचा केंद्र सरकारनेच दिलेला गहू आहे, मग तो कुठे आहे हा प्रश्न कसा पडला? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. राज्याला केंद्र सरकारने ९ लाख ८८ हजार पीपीई किट्स, १६ लाख एन-९५ मास्क दिले आहेत, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.
COMMENTS