अजित दादांकडून भाजपची कोंडी

अजित दादांकडून भाजपची कोंडी

मुंबई: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांच्या माध्यमातून भाजपची कोंडी केली.

अधिवेशन सुरु होताच मुनगंटीवार यांनी मराठावाडा, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. असा सवाल केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैधानिक विकास महामंडळ घोषित करू, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

अजितदादांनी उत्तर दिल्यानंतर फडणवीस यांनी लगेचच त्याला हरकत घेत अजितदादा जे तुमच्या पोटात होतं ते ओठावर आलं. 12 सदस्यांसाठी विदर्भ आणि मराठवाड्याला ओलीस धरणं योग्य नाही. मराठवाड्यातील लोक हे कदापीही सहन करणार नाही. राज्यपाल आणि तुमचं जे काही सुरू आहे. त्याच्याशी या सभागृहाला काहीही घेणं देणं नाही. वैधानिक विकास महामंडळ हा आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागत नाही. आम्ही भिकारी नाही. वैधानिक विकास महामंडळ करा किंवा करू नका, ते आमच्या हक्काचं आहे, आम्ही मिळवून घेऊच, असं फडणवीस यांनी सांगितलं.

COMMENTS