अंबाजोगाई – अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर, बर्दापूर व अंबाजोगाई या खरेदी केंद्राची हरभरा-तूर खरेदीची मुदत आज १५ जुलै पर्यंत वाढविण्यात आली आहे. वरून राजाचे आगमन झाल्यामुळे हरभरा तूर खरेदी साठी व्यत्यय येत असताना पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोना सारख्या गंभीर आजाराचा सामना करत असतानाही बीच कँन्डी रूग्णालयातून केंद्रीय कृषी मंञालयाकडे केलेल्या धनंजय मुंडे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हरभरा खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख यांनी दिली.
अंबाजोगाई तालुक्यामधील एकूण 1.75 लाख क्विंटल हरभरा उत्पादन होते त्यापैकी फक्त 15000 क्विंटल हरभरा खरेदी झाली होती उर्वरित हरभरा खरेदी साठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख यांनी ई-मेल द्वारे पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे पाटील सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे, तसेच कार्यकारी संचालक महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांना केली होती. सदर मुदतवाढ करण्यासाठी कृषी व पणन चे प्रधान सचिव अनुप कुमार व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही प्रयत्न केल्याबद्दल उपसभापती गोविंद देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.
हरभरा खरेदीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा
महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेल्या हरभऱ्याचे पैसे एफ सी आय मार्फत महाराष्ट्र शासनाकडे जमा झालेले आहे परंतु सदरील पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज तागायत जमा करण्यात आले नाहीत. तरी हरभरा खरेदी चे पैसे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी मदत करावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्वरित आदेश द्यावे; अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंबेजोगाई चे उपसभापती गोविंद देशमुख यांनी केली आहे.
COMMENTS