मुंबई – राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात १०६ कोटीचा मोबाईल घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आणखी एक घोटाळा होत असल्याचा दावा केला आहे. आदिवासी विभागात ३२५ कोटी रुपयांचा फर्निचर घोटाळा होत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
काय आहे आरोप ?
आदिवासी विभागाने राज्यातील आदिवासी शाळांमध्ये लागणार्या फर्निचर खरेदीसाठी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी जेम्स पोर्टलच्या माध्यमातून ठाणे विभाग, नाशिक, अमरावती व नागपूर या चार विभागासाठी ३२५ कोटी रूपयांच्या स्वतंत्र चार निविदा प्रसिध्द केल्या. या निविदेत नाशिक विभाग व ठाणे विभागात फक्त एकच ठेकेदार तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरला तर अमरावती व नागपूर विभागात २ ठेकेदार तांत्रिकदृष्टया पात्र ठरलेले होते. त्यानुसार निविदा प्रक्रियेत ३ पेक्षा कमी निविदाकार असल्याने निविदा स्पर्धात्मक होण्यासाठी प्रथम किमान एक आठवड्याची मुदतवाढ देणे आवश्यक होते, त्यानंतरही ३ निविदाकार न आल्याने दुसर्यांदा पुन्हा किमान एक आठवड्याची मुदतवाढ देणे आवश्यक होते, पण कोणतीही मुदतवाढ न देता निविदा अंतिम करून मर्जीतील ठेकेदारांकडून ३२५ कोटी रूपयांची फर्निचर खरेदी करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
दरम्यान या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी फर्निचर खरेदीच्या निविदेला तातडीने स्थगिती दिली असून या स्थगितीमुळे नक्कीच घोटाळा झाला असल्याचा दावाही राष्ट्रवादीनं केला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS