नागपूर – भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. म्हणूनच ते विरोधात बसले आहेत. भाजपला लोकशाहीच कळालेली नाही. भाजपने सत्तेत येण्यासाठी ईडीचा वापर केला, आयकर विभागाच्या धाडी टाकल्या आणि केंद्र सरकारच्या इतर यंत्रणांचा वापर करुन दबाव टाकला. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी रांगेत उभं केलं. स्वतःच्या सोयीची आकडेवारी देऊन जनतेची दिशाभूल केली. त्यामुळेच तुम्ही विरोधात बसला आहात अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे बांधावर गेले. पण त्यावेळी तुम्ही सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत होता. सरकार पाडण्यासाठी तुम्ही देव पाण्यात घातले. पण हे सरकार सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले आहे. कितीही मुंगेरी लालची स्वप्नं पाहिली तरी ती पूर्ण होणार नाही, असाही टोला मुंडे यांनी लगावला.
तसेच भाजपला आज मी पुन्हा येईन असं वाटत आहे. त्यांनी उमेद ठेवावी, पण अजून 15 वर्ष तरी ते सत्तेत येऊ शकत नाहीत. तुम्ही पुन्हा सत्तेत येणार नाही हे सत्य आहे. असं असतानाही तुम्ही थापा मारत आहात. 105 आमदार असूनही त्यांना विरोधात बसावे लागले आहे. कॅगची चौकशीची मागणी केली तर मुख्यमंत्री ती मान्य करतील. मग चंद्रकांत पाटलांना राग का येतो? असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.
COMMENTS