‘आमचा नाथ आमच्या मदतीला धावला’,मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मदतीला धावले धनंजय मुंडे !

‘आमचा नाथ आमच्या मदतीला धावला’,मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या मदतीला धावले धनंजय मुंडे !

परळी – परळी तालुक्यातील देशमुख टाकळी येथील आजारपणाने मृत्यू झालेल्या शेतकरी हनुमान देशमुख (वय – ३५) यांच्या कुटुंबियांना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ते अध्यक्ष असलेल्या ‘नाथ प्रतिष्ठान’च्या वतीने एक लाख रुपयांची मदत केली आहे. आज (दि. १८) रोजी जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते या मदतीचा धनादेश देशमुख यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांना देण्यात आला.

हनुमान देशमुख यांचे दोन महिन्यांपूर्वी ताप येऊन आजाराने दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन लहान मुली असा परिवार आहे. अत्यंत अल्प शेतजमीन असलेल्या या परिवारावर उदरनिर्वाह, शिक्षणाचा खर्च अशा अनेक समस्या येऊन ठेपल्या होत्या. ना. मुंडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांकरवी तात्काळ मदत मिळवून दिली आहे.

मयत हनुमान देशमुख यांच्या पत्नी मीनाक्षी देशमुख यांनी धनंजय मुंडे यांचे ‘आमचा नाथ आमच्या मदतीला धावला’, अशा अत्यंत भावनिक शब्दात आभार मानले आहेत. यावेळी जि. प. गटनेते अजय मुंडे यांच्यासह भरत शिंदे, पोलीस पाटील सुरेश देशमुख, सुभाषराव शिंदे, बापूराव शिंदे, वसंतराव देशमुख, नारायण शिंदे, बबनराव शिंदे, मोहनराव देशमुख, अनंतराव देशमुख, धनंजय शिंदे, अमोल देशमुख, किरण शिंदे, नरेंद्र देशमुख, चंद्रकांत शिंदे, गोविंद देशमुख यांसह आदी उपस्थित होते.

COMMENTS