बीड – कारखान्याच्या जमीन खरेदी प्रकरणी
विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राजाभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली असून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी बरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगतीचे आदेश दिले होते. त्यामुळे फड यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेंविरोधात बेलखंडी मठाची जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात कलम 420, 468, 465, 464, 471 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण 14 आरोपींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात धनंजय मुंडे हे दहाव्या क्रमांकाचे आरोपी होते. धनंजय मुंडे यांच्यासह पत्नी राजश्री मुंडे, बहीण प्रेमा केंद्रे, खंदेसमर्थक सूर्यभान नाना आणि वाल्मिक कराड यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगतीचे आदेश दिले होते. आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS