फलटण -इमानदारीने चौकीदारी करणारा चौकीदार देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देशाच्या चौकीदाराचा समाचार घेतला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या दुसर्या दिवसातील दुसरी सभा फलटण येथे प्रचंड गर्दीमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी धनंजय मुंडे यांनी मित्राच्या घरी जात असताना गाडीत मोबाईल राहिला त्यावेळी त्या इमारतीच्या खाली उभा असलेल्या चौकीदाराला चौकीदार म्हणून हाक मारली असता ‘साब चौकीदार बोलके गाली मत दो’ हे त्यांच्याबाबतीत घडलेला किस्सा सांगून चौकीदाराबाबत किती गैरसमज निर्माण झाले आहेत हे स्पष्ट केले.
याआधी ७२च्या दुष्काळाचे उदाहरण दिले जात होते मात्र यापुढे २०१७-१८ हे वर्ष भीषण दुष्काळाचे उदाहरण म्हणून दिले जाईल. शेतकरी स्वतःचे सरण रचून आत्महत्या करत आहेत. आणि आज मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून जाहीर करतात की महाराष्ट्रात दुष्काळासाठी चार हजार सातशे कोटींचे पॅकेज केंद्राकडून मिळालंय. शेतकऱ्यांवर काय उपकार केले का? असा घणाघात त्यांनी केला.
सरकारमधील मंत्री महादेव जानकर ज्यांना सर्व गोष्टींची जाण आहे असा समज आहे, ते म्हणतात की आम्ही ऑनलाइन चारा देऊ. ऑनलाइन चारा कसा पोहोचेल हो? की त्याचीही अवस्था कर्जमाफीसारखी होईल. काय ऑनलाईन खेळ लावला आहे यांनी?अशी टीका त्यांनी केली.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहितेपाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दिपक चव्हाण, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, महिला जिल्हाध्यक्षा समिधा जाधव, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, आदींसह फलटण, माण, खटाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS