त्यांना निवडून देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर, परंतु मला निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या – धनंजय मुंडे

त्यांना निवडून देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर, परंतु मला निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या – धनंजय मुंडे

बीड, परळी – माझी लढाई ही कोणत्याही एका व्यक्ती विरूध्द नव्हे तर परळीतल्या आणि माझ्या मातीतल्या माणसांच्या भल्यासाठीची ही लढाई, हा संघर्ष सुरू आहे. परळीचे भूमिपुत्र डॉ.महेंद्र लोढा यांनी आज विदर्भात आपल्या समाज कार्याचा ठसा उमटवला आहे. आगामी निवडणुकीत त्यांना यश मिळवुन देण्याची जबाबदारी मित्र म्हणुन माझ्या खांद्यावर आहे, मात्र तुमच्यासाठी लढणार्‍या माझ्यासारख्या भूमिपुत्राला यश मिळवुन देण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर घ्या असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

परळी येथील डॉ.महेंद्र लोढा यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी मित्र व लोकमतचा पॉलिटिकल आयकॉन ऑफ विदर्भ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मित्र परिवार, समाज बांधव, सहकारी डॉक्टर आणि परळीकरांच्या वतीने हालगे गार्डन येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, डॉ.एल.डी. लोहिया, माहेश्‍वरी सभेचे अध्यक्ष रामनिवासजी रांदड, अभय वाकेकर, सत्कार समितीचे प्रमुख चंदुलाल बियाणी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुरेश टाक, प्रा.डॉ.विनोद जगतकर, अमरचंदजी लोढा, लोढा कुटुंबिय, त्यांचे स्नेही, मित्र परिवार व परळीतील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मित्र प्रेमाची अनुभूती

धनंजय मुंडे आणि डॉ.महेंद्र लोढा हे जिवलग वर्गमित्र होते. त्यांच्याच गाढ मैत्रीचा अनुभव आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने परळीकरांना अनुभवता आला. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जावुन आदिवासी बांधवांसाठी असेल की, तेथील सामान्य जनतेसाठी केलेले कार्य असेल, या कार्याची प्रेरणा आपल्याला मित्र असलेल्या धनंजय मुंडेंकडून मिळाली, त्यांच्यामुळेच भविष्यात राजकीय जबाबदारी मिळणार आहे, या संपुर्ण यशाचे श्रेय डॉ.महेंद्र लोढा यांनी धनंजय मुंडे यांना दिले. तर धनंजय मुंडे यांनी डॉ.महेंद्र लोढा हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वणी चे उमेदवारच नव्हे तर भावी आमदार असतील असे संकेत देताना त्यांच्या विजयात आपण कोठे ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही दिली. या दोन्ही ही मित्रांनी व्यासपीठावर घट्ट मिठी मारून आपल्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

धनंजय मुंडेंनी मांडला विकासाचा रोड मॅप

कार्यक्रमाला परळीकरांची असलेली लक्षणीय उपस्थिती पाहुन धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या स्वप्नातील परळीच्या विकासाचा रोड मॅप उपस्थितांसमोर मांडला. मागील 10 वर्षात 4 वेळेला लेकींना संधी दिली, या लेकाला कधी आशिर्वाद देणार ? असा प्रश्‍न विचारत त्यांनी उपस्थितांच्या भावनेला हात घातला. केंद्रात, राज्यात सत्ता असतानाही परळीत उद्योग आला का ? थर्मल का बंद पडले ? साधी परळी-मुंबई रेल्वे का सुरू झाली नाही ? रेल्वे स्टेशनचे उत्पन्न मागील 6 वर्षांपासून 400 कोटींवरून 64 कोटींवर आले, या सर्व गोष्टींचा परळीकरांच्या आर्थिक जीवनाशी संबंध असताना याचा विचार आपण करणार आहात की नाही ? असा प्रश्‍न विचारला. केवळ रस्ते, वीज, नाल्या, पाणी म्हणजेच विकास नव्हे तर माणसाची आर्थिक उन्नती करणे हे आपले स्वप्न असून, त्यासाठी या लेकाला आशिर्वाद द्या, असे आवाहन केले.

विघ्न आणि संघर्षाशी खेळतो आहे

रविवारी सकाळीच धनंजय मुंडेंच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात झाला, सुदैवाने धनंजय मुंडे हे या गाडीत नव्हते, त्याचा संदर्भ घेत मागील 24 वर्ष मी विघ्न आणि संघर्षाशी खेळतो आहे, कोणतेही संकट मला थांबवु शकत नाही, प्रभु वैद्यनाथ आणि परळीतील जनतेचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत, ते कायम राहु द्या, तुमच्या सेवेत मी कदापी ही कमी पडणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.

सुरूवातीला डॉ.लोढा यांचा मुंडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदुलाल बियाणी यांनी, सुत्रसंचलन प्रशांत प्र. जोशी, चंद्रशेखर फुटके, सौ.सुजाता फुटके यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.विजय रांदड यांनी मानले.

COMMENTS