बीड, परळी – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे आपल्या परळी येथील ‘जगमित्र’ कार्यालयात आज परळी मतदारसंघातील जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध होते. सामान्य परळीकरांची गाऱ्हाणी, अडचणी, मागण्या, निवेदने स्वीकारत तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ झाला तरी रात्री उशिरापर्यंत हा जनता दरबार सुरूच होता.
सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हजारावर लोकांनी आपले निवेदन – मागण्या धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडल्या. हे सत्र रात्री उशिरापर्यंत सुरूच होते व मुंडे यांच्यासमोरील गर्दी ६ तास उलटून गेले तरी तेवढीच दिसत होती.
यावेळी परळी मतदारसंघ व परिसरातील अनेक नागरिक, महिला, विद्यार्थी आदींनी विविध विभागातील आपली प्रलंबित कामे, दफ्तर दिरंगाईचे विषय, विविध विभागातील बदली सारख्या मागण्यांचे शिफारस अर्ज, सामाजिक न्याय विभाग व अन्य विभागातील विविध मागण्यांसादर्भातील निवेदने सादर करून आपले म्हणणे ‘आपल्या माणसापुढे’ मांडण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.
मुंडे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच असा जनता दरबार घेतल्याने भेटणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती व ती संख्या वरचेवर वाढतच होती. आपल्या जगमित्र कार्यालयातील समोरच्या रिसेप्शन टेबलालाच खुर्ची मांडून श्री. मुंडे बसले तसेच आलेल्या शेवटच्या माणसाचे समाधान होईपर्यंत बसून एक एक काम मार्गी लावणे सुरू होते हे विशेष!
नेहमीच्या शैलीत…
मुंडे यांचा ‘हॅलो, मी धनंजय मुंडे बोलतोय;’ हा फोन कॉल सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्या आपल्या नेहमीच्या शैलीतच अनेक प्रकरणी संबंधित अधिकारी – कर्मचारी आदींना फोनवर निरोप देत, अनेक प्रकरणांचा मुंडेंनी जागीच निपटारा केला.
विधानसभा निवडणुकी पूर्वीही धनंजय मुंडे यांचा मतदारसंघात असलेला थेट जनसंपर्क हा चर्चेचा विषय ठरला होता तसेच मुंडेंच्या विजयामागे हाच जनसंपर्क टिकवून ठेवणे हे एक महत्वाचे कारण ठरल्याचे बोलले जाते. धनंजय मुंडे यांचा आजचा जनता दरबार, त्यांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि मतदारसंघातील जनतेचा प्रतिसाद पाहता त्याची पुन्हा एकदा प्रचिती येते! मुंडेंच्या या शैलीमुळे गेल्या काही वर्षात मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली विकासाची अनेक कामे आता मार्गी लागतील अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली.
COMMENTS