मुख्यमंत्री महोदय, उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका – धनंजय मुुंडे

मुख्यमंत्री महोदय, उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका – धनंजय मुुंडे

परळी – कालबाह्य निर्णयांमुळे राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेत पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांवर अन्याय होत असल्याबाबत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीले असून, मुख्यमंत्री महोदय, आमरण उपोषणास बसलेल्या या उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका तर या प्रकरणात तातडीने लक्ष घालून त्यांना न्याय द्या अशी मागणी केली आहे.

राज्य शासनाच्या वतीने सध्या विविध खात्यात सुरू असलेल्या मेगा भरतीमध्ये जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम व जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता गट-ब या पदासाठी पदवीकाधारक ही शैक्षणिक पात्रता निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र राज्यात बेरोजगार असलेल्या पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांनीही या भरती प्रक्रियेत पदवीका धारकाप्रमाणे आम्हालाही संधी मिळावी या मागणीसाठी मागील 4 दिवसांपासून पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणार्थ्यांपैकी स्वप्नील खेडेकर आणि स्वप्नील चौरे या दोघांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात धनंजय मुंडे यांनी या पदवीधारक बेरोजगारांच्या उपोषणाला पाठींबा देत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या मेगा भरतीमध्ये पदवीकाधारकांबरोबरच पदवी धारकांनाही संधी मिळावी, या साठी जुन्या नियमात बदल करून या मुलांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र ट्विट केले असून, त्यात आमरण उपोषणाला बसलेल्या या उच्च शिक्षित बेरोजगार तरूणांना पकोडे तळायला सांगु नका तर त्यांना न्याय द्या, असे म्हटले आहे. सरकारला मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये वेटरचे काम करण्यासाठी चौथी पास ऐवजी पदवीधर निवडता येतात तर कनिष्ठ अभियंता पदासाठी स्थापत्य पदवीकाधारकांबरोबर स्थापत्य पदवीधारकही का चालत नाहीत ? असा सवालही उपस्थित केला आहे.

COMMENTS