सिन्नर, (नाशिक) – कांदा उत्पादक शेतकरी आज कांद्याला भाव नाही म्हणून ढसाढसा रडत आहे. आंदोलनं करत आहेत. भाजपला मतदान करून गेल्या निवडणुकांमध्ये केलेल्या चूकीबद्दल बॅनर लावून पवार साहेबांची माफी मागत आहे. त्यांच्या मालाला आज भाव नाही त्यांना ठोस मदत करण्याऐवजी केवळ दोन रुपयांचे तुटपुंजे अनुदान देताना सरकारला लाज वाटत नाही का? असा घणाघाती सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या निर्लज्जपणावर ताशेरे ओढले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्याची सुरुवात आज नाशिक येथील सिन्नरच्या सभेतून झाली, त्यावेळी ते बोलत होते.
सात महिने झाले भुजबळ यांच्या छातीत का दुखत नाही, असा मेसेज भाजपाच्या सोशल मीडिया गोटातून व्हायरल होत आहे. त्याचा समाचार घेतांना महाराष्ट्राच्या इतिहासात राजकारणाची इतकी खालची पातळी कोणी गाठली नव्हती अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली. राष्ट्रवादीचा नाद करू नका अशी ताकीद देत, आम्ही यांना पुरून उरू असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
आणि ते बालपणात रमले…
धनंजय मुंडे भाषणासाठी उठताच शाळेची घंटा वाजली आणि धनंजय मुंडे यांना आपल्या शाळेची आवठण झाली. ही घंटा ऐकताच मीही थोडा लहानपणी गेलो अशी कबुलीही मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीला दिली.
या सभेत धनंजय मुंडे यांना आपल्या शाळेची आठवण झाली. सभेच्या बाजूला असलेल्या शाऴेतील मुलांचा किलबिलाट ऐकून त्यांना त्यांच्या बालपणाची आठवण झाली. शाळेच्या आठवणी या वेगळ्याच असतात आणि शाळेच्या मधल्या सुट्टीचा आनंद शब्दात व्यक्त होण्यासारखा नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
या सभेला ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, आ. जितेंद्र आवाड, आमदार हेमंत टकले, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार समीर भुजबळ, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,माजी आमदार जयंत जाधव, नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे, पुणे माजी महापौर राजलक्ष्मी भोसले,सिन्नर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ आदींसह सिन्नर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS