बीड – राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट, विविध प्रश्नासंदर्भात केली दोन तास चर्चा !

बीड – राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट, विविध प्रश्नासंदर्भात केली दोन तास चर्चा !

बीड –  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके, यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने आज बीडच्या जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली.  यावेळी नगरपालिका, जिल्हा परिषद कायदा व सुव्यवस्थेसंबंधीचे अनेक प्रश्‍नही त्यांनी प्रशासनासमोर मांडले. रोज वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीला आळा घालावा अन्यथा तिव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाधिकार्‍यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला. वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध, जिल्ह्यात हमीभावाने शेतमालाची खरेदी केंद्र सुरू करावीत, पिक विम्याचे 100 टक्के वाटप करावे यासह विविध मागण्या या शिष्टमंडळाने केल्या आहेत.

जिल्ह्यातील आडत व्यापारी संपावर असल्याने शेतकर्‍यांना त्यांच्याकडील मुग, उडीद व लवकरच येणारे सोयाबीन कोठे विकावे ? असा प्रश्‍न पडला आहे. शेतकर्‍यांची ही गैरसोय दुर करण्यासाठी शासनाने हमीभावाने शेतमाल खरेदीची केंद्र सुरू करावीत अशी मागणी या वेळी करण्यात आली. बीड जिल्ह्यात 100 टक्के पिक विम्याचे वाटप करावे, पिक विमा वाटपात झालेला घोळ दुरूस्त करून शेतकर्‍यांना 100 टक्के पिक विम्याचा लाभ द्यावा या संदर्भातीही जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात नसणार्‍या धारूर, माजलगाव येथील नगर पालिकांमध्ये सुरू असणारा गैरकारभार, परळी, बीड या नगर पालिका, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतीमध्ये विविध सार्वजनिक कामांसंदर्भातही शिष्टमंडळाने यावेळी चर्चा केली.या शिष्टमंडळात माजी आ. राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, सौ. उषाताई दराडे, रा.कॉ. जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष सौ.रेखाताई फड, युवक नेते अजय मुंडे, संदिप क्षीरसागर, परळीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, महेंद्र गर्जे, अविनाश नाईकवाडे, बीड चे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, नगरसेवक गोपाळ आंधळे, अनिल अष्टेकर, भावड्या कराड, शेख महेबुब, बाळासाहेब खेडकर, विश्‍वास नागरगोजे, सतिश आबा शिंदे यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हा नियोजन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी संबंधित नगर पालिकांचे मुख्याधिकारी यावेळी  उपस्थित होते. तब्बल 2 तास जिल्ह्यातील प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था आहे का ?

बीड जिल्ह्यात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाबाबतही शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा केली. जिल्ह्यातून नुकत्याच गायब झालेल्या एका मुलीच्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणीही त्यांनी केली.

COMMENTS