नितीन गडकरींनी मला शब्द दिलाय, भेटीनंतर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य!

नितीन गडकरींनी मला शब्द दिलाय, भेटीनंतर धनंजय मुंडे यांचं वक्तव्य!

बीड, परळी – परळी – सिरसाळा- तेलगाव व परळी – गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली. या कामाचे टेंडर लवकरच निघेल अशी आशा गडकरी यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली असून परळी अंबाजोगाई या रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यातील तांत्रिक बाबीही पूर्ण होऊन काम लवकरच सुरू झालेले दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचा कामासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला उपस्थित राहून धनंजय मुंडे यांनी आपल्या परळी विधानसभा मतदारसंघाचा दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या परळी – सिरसाळा- तेलगाव व परळी – गंगाखेड या मार्गाचा विषय उपस्थित केला.

या दोन्ही मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला असून टेंडर प्रक्रिया बाकी आहे त्याबाबत श्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एप्रिल अखेरपर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असा शब्द दिल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

परळी अंबाजोगाई या रस्त्याचे उद्घाटन झाले असले तरी काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी मुळे काम सुरू झाले नसले तरी त्याचेही काम लवकरच सुरू होणार असून त्याकडेही श्री गडकरी यांचे लक्ष वेधून याबाबत तातडीने काम सुरू करण्याबाबत सूचना देण्याची विनंती केली . त्यानुसार श्री. गडकरी यांनी अधिका-यांना निर्देश दिले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात धनंजय मुंडे यांनी परळी शहराला जोडणारे परळी अंबाजोगाई, परळी तेलगाव व परळी – गंगाखेड हे अतिशय महत्त्वाचे रस्ते राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करून दळणवळणाच्या दृष्टीने सुलभ सोय करण्याचे आश्वासन दिले होते त्याचा पाठपुरावा त्यांनी जोमाने सुरू केला आहे.

COMMENTS