नागपूर – येत्या २३ तारखेला महा विकास आघाडी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या खात्यांपैकी वित्त व नियोजन किंवा जलसंपदा या अतिशय महत्वाचे समजल्या जाणाऱ्या खात्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘फायर ब्रँड’ नेते माजी विरोधीपक्षनेते आ. धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचे अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे.
प्राथमिक विस्तारामध्ये वित्त व नियोजन खाते जरी जयंत पाटील यांच्याकडे असले तरीही ऐनवेळी खातेवाटपाच्या वेळी या खात्यावर किंवा जलसंपदा खात्यावर धनंजय मुंडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यापासून मुंडेंचा आलेख कायम चढता राहिलेला आहे. विरोधीपक्षनेते पदी वर्णी लागल्यापासून अनेक आक्रमक भाषणांनी त्यांनी विधानपरिषद गाजवली. आपल्या आक्रमक व अभ्यासू शैलीत तत्कालीन सरकारच्या १६ मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड केले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यभरात लोकप्रिय झालेल्या हल्लाबोल, परिवर्तन व शिवस्वराज्य या तीनही यात्रांच्या यशात धनंजय मुंडे यांचे मोलाचे योगदान आहे.
पक्ष अडचणीत असताना बळकटीकरण करण्यासाठी एक खांब रोवल्याप्रमाणे उभे धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत तब्बल ८५ सभा घेतल्या होत्या, तर विधानसभा निवडणुकीत स्वतःची हाय व्होल्टेज निवडणूक सांभाळत राज्यात जवळपास 38 सभा घेतल्या; स्वतःच्या जिल्ह्यात ६ पैकी ४ उमेदवार निवडून आणले. तसेच २० हून अधिक विजयी उमेदवारांसाठी सभाही घेतल्या.
धनंजय मुंडे यांनी विधानसभेतील पहिल्या वहिल्या भाषणातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘पवारांचा नाद करू नका’ असे ठणकावून सांगतच आपल्या खुमासदार शैलीत भाषण करत आपल्या नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात संभाळलेली धुरा व पक्षवाढीसाठीचे मुंडेंचे योगदान पाहता मुंडेंना अत्यंत महत्त्वाचे खाते पहिल्या यादीतच मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु आता दुसऱ्या यादीत अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे वित्त व नियोजन तथा जलसंपदा खात्याच्या दावेदार पदी धनंजय मुंडे यांचे नाव आल्याने मुंडेंच्या समर्थकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
जलसंपदा खात्यासाठी श्री जयंत पाटील यांचा स्वतःचा आग्रह असल्यामुळे त्यांनाही खाते मिळेल तर उपमुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री पदाचा बहुमान अपेक्षेप्रमाणे अजित दादा पवार यांनाच मिळणार असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
COMMENTS