बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील मास वर्गालाही झाला पाहिजे – धनंजय मुंडे

बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील मास वर्गालाही झाला पाहिजे – धनंजय मुंडे

पुणे – बार्टी या संस्थेच्या योजनांचा लाभ समाजातील फक्त मोजक्या क्लास वर्गाला नाही तर शेवटच्या माणसालाही आणि मास वर्गालाही झाला पाहिजे, असे काम हाती घ्यावे अशी सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुंडे यांनी आज प्रथमच पुणे येथे बार्टी संस्थेस भेट दिली व बार्टीमार्फत अनुसूचित जातींतील वंचित घटकांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांचा सखोल आढावा घेतला आणि अनेक मार्गदर्शनपर सूचना केल्या.

सुरुवातीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व आज संत सेवालाल यांची 281 वी जयंती असल्याने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार करून त्यांनी अभिवादन केले. बार्टीच्या दैनंदिनीचे त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आणि प्रकल्प निहाय आढावा बैठकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या.

यात,नागपूर व औरंगाबाद येथे एम.पी.एस.सी. बरोबरच यू.पी.एस.सी. कोचिंग सेंटर सुरू करणे, लाभार्थी निवड प्रक्रियेत पारदर्शकता रहावी म्हणून स्पर्धा परिक्षांच्या निवड परिक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घेणे., आय.बी.पी.एस. स्पर्धा पूर्वप्रशिक्षणाकरीता दिव्यांग लाभार्थ्यांकरीता आरक्षण 4 टक्क्यावरून वाढवून 5 टक्के करण्यात यावे.

ऊस तोड कामगारांची लोकसंख्या निश्चित करण्याकरीता महाराष्ट्र व कर्नाटक येथील संबंधित सहकारी व खासगी साखर कारखान्यांशी संपर्क साधून नोंदणी यंत्रणा उभारण्याबाबत बार्टीमार्फत संशोधन व सर्वेक्षणावर आधारित नियोजनबध्द व्यवस्था राबविणे.बीड जिल्हयातील ऊस तोड कामगारांना मागील पाच वर्षांच्या ऊस तोडीच्या कामाच्या आधारे ऊस तोड कामगार म्हणून अधिकृत दाखले देण्याची व्यवस्था करणे.

कौशल्य विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्यांच्या मागणीचा अभ्यास करून कौशल्य विकास प्रशिक्षणाचे कोर्सेस आणि संस्थांची निवड करणे. वंचित घटकांतील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा पूर्वपशिक्षण देण्याबरोबरच बहुसंख्य अशा सर्वसामान्य वर्गालाही लाखोंच्या संख्येने प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून बार्टीचा ब्रँड होईल असे कामकाज करणे.

महाराष्ट्रातील 68 टक्के आरक्षणापैकी 61 टक्के आरक्षण सामाजिक न्याय विभागाकडे असल्याने त्यांना जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची पारदर्शक यंत्रण उभारावी व वेगवान करावी.

बार्टीच्या समतादूतांसारख्या प्रभावी मनुष्यबळाकडून पूर्ण क्षमतेने 100 टक्के काम करून घेणे. त्याकरीता त्यांची कार्यशाळा आयोजित करणे.त्यांची संख्या 300 वरून वाढवून 700 करणे आणि त्यांच्या वेतन व इतर सवलतींमध्ये आवश्यकतेनूसार वाढ करणे. त्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन करून त्यांच्या कामाचा नियोजनबध्द आराखडा तयार करणे.

बार्टी व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या प्रभावी, परिणामकारक आणि वेगवान प्रसिध्दीकरीता वतामानपत्रे, मासिके, माहितीपुस्तिका, प्रबोधनात्मक कार्यक्रम इ. पारंपारिक माध्यमांरोबरच फेसबुक, टिवटर, यु. टयुब, एफ.एम. आणि टि.व्ही चॅनल्स यासारख्या आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून योजनांना प्रसिध्दी देणे. त्याकरीता व्यवसायिक संस्थांची मदत घेणे.

बार्टीच्या औरंगाबाद येथील जागेत अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या बालकांसाठी के. जी. टू. पी. जी. शिक्षण व्यवस्था असलेल्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त सैनिकी शाळेची आणि प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणे.

वरीलप्रमाणे बार्टीच्या कामाची गुणवत्ता वाढीसाठी विविध महत्वपूर्ण सूचना देण्याबरोबरच महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 25 टक्के लोकसंख्या असणाऱ्या अनुसूचित जातीतील वंचित घटकांना न्याय देण्याचा बार्टीचा उद्देश असावा असा आपला मानस यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

दरवर्षी प्रज्ञावान वर्गाबरोबरच सर्वसामान्य वर्गाकरीता किंमान एक लाख व त्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना बार्टीमार्फत कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात किमान पाच लाख लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा मनोदय यावेळी त्यांनी बोलून दाखवला. आणि त्याकरीता बार्टीला आवश्यक तो सर्व निधी वाढवून देण्याचे आश्वासन दिले.

या महत्वाकांक्षी कामाकडे प्रोफेशन म्हणून नाही तर मिशन म्हणून बघण्याचे आवाहन बार्टीच्या उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.कामात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि वेग राहिल याची दक्षता घेण्याबाबत निक्षून सूचना दिल्या.

अपेक्षित कामकाजाच्या पाठपुराव्याकरीता वेळोवेळी बार्टीबरोबर आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षात सामाजिक न्याय विभागाचे कामकाज इतके चांगले करूयात की प्रत्येक मंत्र्याला सामाजिक न्याय हे महत्वाचे खाते स्वत:कडे ठेवावेसे वाटेल अशी इच्छा व्यक्त केली. फक्त विशेष घटकांसाठी काम करणारा, त्याच त्याच पारंपारिक योजना राबविणारा, त्याच त्याच प्रॅक्टीसेस चा वापर करणारा यात बदल करून आणखीन चांगल्या व नवनवीन योजना आणूयात. त्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा कराव्या लागल्या तर करूयात. त्यामुळे सगळयांनी प्रभावीपणे काम करूयात आणि इतर राज्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण घ्यावे असे वेगळे कामकाज करून दाखवूयात असे महत्वाकांक्षी विचार मा. मंत्री, महोदयांनी मांडले आणि बार्टीच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले.

बार्टीचे महासंचालक, श्री. कैलास कणसे, भापोसे यांनी आभार मानले व आढावा बैठकीची सांगता करण्यात आली. यावेळी बार्टीचे मा. निबंधक, श्री यादव गायकवाड, बार्टीच्या विविध विभागांचे प्रकल्प संचालक, समता प्रतिष्ठान, नागपूरचे लेखाधिकारी व समाजकल्याण आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त श्री. खंदाते व इतर अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित असणाऱ्या अपंगकल्याण आयुक्तालयाच्या मा. आयुक्त, तथा बार्टीच्या यू.पी.एस.सी. पूर्वप्रशीक्षण योजनेच्या दुसऱ्या बॅचच्या प्रशिक्षणार्थी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांचे मा. मंत्री महोदयांच्या हस्ते दीक्षाभूमीची प्रतिकृती भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशासनात होणाऱ्या प्रत्येक महत्वपूर्ण उच्चस्तरीय बैठकीत माझ्या डावीकडे आज जशा प्रेरणा देशभ्रतार मॅडम बसल्या आहेत तशा डावीकडे, उजवीकडे आणि समोर असे उच्च्‍ पदावर बसलेले अनेक अधिकारी बार्टीतर्फे घडोत असे सकारात्मक उदगार मा. मंत्री महोदयांनी काढले.

COMMENTS