बीड – चाटगाव ता. धारूर येथील रेल्वेच्या कामात मजुरी करणाऱ्या कुटुंबातील ८ वर्षाच्या तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या संविधान दीपक गडसिंगने आपल्याला मिळालेल्या बक्षिसाची दहा हजार रुपये रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. संविधानने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी ‘तुझ्या संविधान या नावातच सर्वकाही आहे,’ अशा शब्दात मुंडेंनी संविधान व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले.
काही दिवसांपूर्वी चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक व सत्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने आज या संकटाशी सामना करत असलेल्या राज्य सरकारला देऊन त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी त्याने केली आहे असे मुंडे यावेळी म्हणाले.
संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड परळी रेल्वेमार्गावर मजुरी का करतात, घरची परिस्थिती तशी नाजूकच, तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्याजोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे, असे मुंडे यांनी म्हटले आहे. यावेळी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आ. अमरसिंह पंडित यांसह आदी उपस्थित होते.
COMMENTS