बीड, परळी – बीड जिल्ह्याचा शुन्य अखेर फुटला असून शनिवारी जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. माजलगाव व गेवराई तालुक्यातील एक एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, ते दोनही व्यक्ती विना परवानगी जिल्ह्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, छुप्या मार्गाने बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती लपवू नका, प्रशासनाला त्याची माहिती द्या. तसेच सोमवार (दि. १८) पासून सुरू होत असलेल्या लॉकडाऊन – ४ चे नियम काटेकोरपणे पाळा असे आवाहन जिल्हा वासीयांना केले आहे.
कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजलेला असताना बीड जिल्ह्यात मात्र आतापर्यंत कोरोनाला हद्दीबाहेर रोखण्यात यश आले होते; मात्र लॉक डाऊन मधील शिथिलतेसह गेल्या काही दिवसात परवानगीने व काही अंशी परवानगीशिवाय छुप्या मार्गाने बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. काही गावांमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये कमालीची सतर्कता व काळजी बाळगली जात आहे; मात्र काही ठिकाणी ही माहिती लपवली जात असल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी आजमितीला उंबरठ्यावर रोखलेले संकट आपल्या घरात येऊन पोचले आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या बरोबरीने नागरिकांचीही मोठी जबाबदारी असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी नमूद केले आहे.
राज्यात व राज्या बाहेर अडकलेल्या नागरिकांनी बाहेरून रीतसर परवानगीने जिल्ह्यात यावे, त्यासाठी आवश्यक आरोग्य तपासणीसह क्वारंटाईन राहणे आदी सर्व नियमांचे पालन केले जावे, त्यात कोणत्याही प्रकारचा कसूर सहन केला जाणार नाही. त्याचबरोबर गावातील व शहरातील स्थानिक शासकीय यंत्रणांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी अशी सूचनाही ना. मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान बाहेरून येत असलेले लोकही आपलेच आहेत, त्यांच्याबद्दल सर्वांना आस्था व आपुलकी आहे; परंतु कोणाच्याही बेजबाबदार वागण्याने इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये असेही मुंडे म्हणाले.
सोमवार पासून देशभरात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन – ४ सुरू होत आहे. या काळात पुन्हा एकदा जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना बाधितांची संख्या २ असून, या दोन व्यक्तींच्या प्रवास इतिहासासह संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी व अलगिकरण प्रक्रिया करण्यात आली आहे, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत तथा अफवांना बळी पडू नये असे धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा नमूद केले आहे.
COMMENTS