भाजपच्या काळात बोगस कामे?, दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, धनंजय मुंडेंनी दिले चौकशीचे आदेश!

भाजपच्या काळात बोगस कामे?, दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, धनंजय मुंडेंनी दिले चौकशीचे आदेश!

मुंबई – सन 2016 मध्ये बीड येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारत दुरुस्तीसह विविध कामे कागदांवर दाखवून लाखो रुपयांचा निधी हडप केल्याचा आरोप करण्यात आल्या नंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याची दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे.

२०१६-१७ मध्ये भाजप सरकारच्या काळातील हा सावळा गोंधळ असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात डागडुजी, पेव्हर ब्लॉक, कारशेड आदी कामाच्या नावाने १.१३कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र संबंधित कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत कामे न करताच निधी हडप केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाने तो निधी अडवला आहे.

सन २०१६-१७ मध्ये सामाजिक न्याय भवन परिसरातील मेन गेट, पेव्हर ब्लॉक,वाहन तळ, पार्किंग, या कामाची निर्मिती व डागडुजी करण्यासाठी टेंडर काढण्यात आले. मात्र किरकोळ दुरुस्ती करण्याची गरज नसताना कंत्राटदाराने अधिकाऱ्याला हाताशी धरून कामे न करताच लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा डाव रचला, परंतु समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हे लक्षात येताच हा निधी अडवण्यात आला असल्याचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी सांगितले.

कागदोपत्री कामे पूर्ण झाले असल्याचे दाखवत तसा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला. प्रत्यक्षात मात्र याठिकाणी कुठलीच कामे झालेली नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी रोखण्यासाठी पत्रव्यवहार केला गेला. मात्र अधिकारी लक्ष देत नसल्याने आम्ही तो निधी अडवला असेही समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी याविषयी खुलासा करताना सांगितले.

दरम्यान वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या आपल्या कार्यात कुणी अडसर आणल्यास किंवा विभागात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा समोर आल्यास त्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही असा सज्जड दम सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीच पहिल्याच बैठकीत दिला होता.

त्यांनतर २०१६-१७ च्या या कामांच्या बाबतीत उघड झालेल्या या प्रकरणाची दखल घेत मुंडे यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच आपण या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशीही बोलणार असून त्यांच्या विभागातूनही काम पूर्ण नसताना पूर्णत्व प्रमाणपत्र कसे काय देण्यात आले याबाबतही चौकशी करायला लावणार असल्याचे व दोषीवर कडक कारवाई करणार असल्याचे मुंडे म्हणाले.

COMMENTS