मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० मधील पिकांना विम्याचे संरक्षण देण्यासाठी ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. खरीप हंगामातील पेरणी अंतिम टप्प्यात आली तरी कोणत्याही पीकविमा कंपनीने खरीप – २०२० साठी बीड जिल्ह्यातील निविदा प्रक्रियेत भाग न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोरोनामुक्त झाल्यापासून सातत्याने या बाबीचा पाठपुरावा करत होते, काल (दि. ०८) रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही मुंडेंनी बीड जिल्ह्यातील पीकविमा प्रश्नाकडे मंत्रिमंडळाचे लक्ष वेधत आक्रमक भुमिका घेतली होती.
त्यानुसार राज्य शासनाच्या कृषी विभागाने बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० साठी आता ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी (AIC) सोबत चर्चा करून त्यांना ही जबाबदारी दिली आहे. पीकविमा अदा करतेवेळी कंपनीस जादा भार येत असल्यास त्यातील काही भार राज्य शासनाच्यावतीने उचलण्याच्या सन्मान्य तोडगा काढण्यात आला आहे.
दरम्यान रब्बी हंगाम २०१९ मध्ये बीड जिल्ह्यातील पिकविम्याच्या निविदा प्रक्रियेत एकाही विमा कंपनीने भाग घेतला नव्हता, तत्कालीन पालकमंत्र्यांना त्यावेळी यावर तोडगा काढता न आल्याने त्यावेळी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिविम्यापासून वंचित राहावे लागले होते.
मात्र बीड जिल्ह्यात यापुढे शेतकऱ्यांना पिकविम्यासाठी ताटकळत बसावे लागणार नाही, आपण स्वतः राज्य शासन कृषी विभाग व संबंधित पीक विमा कंपनी यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम करू व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना वेळोवेळी विम्याचे संरक्षण मिळवून देऊ असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
COMMENTS