मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल!

मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल!

मुंबई – कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं सरकारविरोधात आज आंदोलन पुकारलं आहे. ‘राज्यातील जनतेनं शुक्रवारी आपापल्या घराबाहेर पडून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा,’ असं आवाहन भाजपनं केलं आहे. भाजपच्या या आंदोलनावर मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना, मातीशी इमान न राखणारे काहीजणं आंदोलन करत आहेत. राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या सर्वांचाच हा अपमान आहे. मातीशी केलेली गद्दारी महाराष्ट्र कधीच विसरणार नाही असं ट्वीट मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारले आहे. प्रदेश भाजपचे ‘महाराष्ट्र बचाव आंदोलन’ म्हणजे नेमके काय, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने भाजपला टोकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित असल्याची भावना जनतेची आहे.

त्यामुळे सध्याच्या उठवळ विरोधी पक्षापासूनच महाराष्ट्राला वाचवा, असे सांगण्याची वेळ आली आहे, असे ‘सामना’ संपादकीयमध्ये म्हटले आहे. राज्यात प्रकाशमान, तेजस्वी करण्याचे युद्ध सुरु असताना राज्य ‘काळे’ करण्याचे आंदोलन सुरु झाले आहे. डोमकावळ्यांचे हे फडफडणे औट घटकेचेच ठरेल, याविषयी काही शंका नाही. पाटील-फडणवीसांनी भान राखून वागावे आणि बोलावे. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो, मात्र विरोधकांत शहाणपण उरले आहे काय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

COMMENTS