बीड, अंबाजोगाई – भाजप नेत्यांनी मधल्या काळात फोडाफोडी केली, त्यांच्यातील काहींना सांगितलं की होतं, की पवार साहेबांचा नाद करू नका, काहींनी केला; आता भोगत आहेत! “पवार साहब की लाठी ऐसी बैठती है, बहुत दिनो के बाद पता चलता है की कैसी बैठी।” अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांविरुद्ध तुफान टोलेबाजी केली आहे; महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे आयोजित पदवीधर मेळाव्यात बोलत होते.
अंबाजोगाई येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ पदवीधर मेळाव्याचे आयोजन महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने करण्यात आले होते. या मेळाव्यास मुंडे यांच्या सह आ. विक्रम काळे, आ. अमोल मिटकरी, आ. संजय दौंड, बीड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, माजी आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोरपापा मोदी, शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, दत्ता पाटील, राजपाल लोमटे, बबनभैय्या लोमटे, रणजित लोमटे, संगीता तुपसागर, तानाजी देशमुख, विलास सोनवणे, बाळासाहेब शेप, यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते, पदाधिकारी, पदवीधर – शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबाजोगाई तालुक्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधिक पदवीधर नोंदणी झालेली असून, ही नोंदणी प्रक्रिया राबविणाऱ्या सर्व घटकांचे मुंडे यांनी अभिनंदन केले. येथे मतदानही सर्वाधिक होईल असा विश्वास यावेळी बोलताना मुंडे यांनी व्यक्त केला. शिक्षक – पदवीधर यांच्या विविध प्रश्नांसह गेल्या वर्षभरात कोरोना व अन्य प्रश्नांवर राज्य सरकारने केलेल्या कामगिरीवरही धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले.
मदत केंद्र सरकारला आणि प्रश्न राज्य सरकारला विचारणाऱ्या राज्य भाजप नेतृत्वाचा पुरता गोंधळ उडाला असून, त्यांच्या अपप्रचारकडे लक्ष देण्याचीही आता गरज नसल्याचे मुंडे म्हणाले. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेचाही मुंडे यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला.
राज्याचे पैसे केंद्राकडे अडकून असताना, राज्याच्या तिजोरीवर ताण असताना देखील राज्य सरकार कठीण प्रसंगात चांगले काम करायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे, डोक्याला तेल लावलेले विरोधक मात्र आपले पाप झाकून नको त्या मुद्द्यांना हवा देऊन विरोध आणि टीका करण्याचं राजकारण करत आहेत, या राजकारणाला आपल्या मतातून उत्तर देऊन भाजपची पुन्हा पदवीधर निवडणूक लढायची हिम्मत होणार नाही असे विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले.
COMMENTS