शेतकरी वर्गाबाबत हे सरकार निर्ढावलेले, यांची कातडी गेंड्यालाही लाजवेल – धनंजय मुंडे

शेतकरी वर्गाबाबत हे सरकार निर्ढावलेले, यांची कातडी गेंड्यालाही लाजवेल – धनंजय मुंडे

मुंबई – सरकारने दुष्काळाबाबत शेतकऱ्यांना कसल्याच प्रकारचा दिलासा न दिल्याने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विरोधी पक्षांतील इतर सदस्य कमालीचे आक्रमक झाले. दुष्काळाबाबत विधान परिषदेत बुधवारी झालेल्या चर्चेवर आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. त्यावर मुंडे यांनी हल्लाबोल केला.

“सरकारने केंद्राकडे दुष्काळाबाबत अजून कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. अजून एकाही शेतकऱ्याला एक छदामही सरकारने दिलेला नाही. चारा विकत घेण्याची ऐपत सध्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाही. सरकारने आणि विमा कंपन्यांचे हातात हात असल्याने त्यांना हजारो करोड रुपयांचा फायदा होतो आणि शेतकरी आत्महत्या करतोय; निसर्ग तर कोपालच आहे पण हे पाषाणहृदयी सरकार आहे. हे सुलतानी संकट आहे. गेंड्यापेक्षा या सरकारची कातडी जाड आहे” अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

“रोजगार हमी योजनेची मजुरी वाढवून ३५० रुपये अशी प्रतिदिन वाढवण्याची मागणी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे मात्र सरकारने याबाबत अजूनही कोणताही निर्णय घेतलेला नाही. केंद्र सरकारकडून मदत मिळण्यास वेळ लागत आहे म्हणूनच आम्ही रोख रक्कमेची मागणी केली होती. प्रांत नाही तर तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत अशी मागणी होती त्यावर सरकार गप्प आहे. कृषी पंपांची ३३ टक्के नाहीतर संपूर्ण वीजबिल माफी करावी. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबतही सरकार उत्सुक नाही.” असे विविध मागण्यांबाबत धनंजय मुंडेंनी प्रतिपादन केले. बोन्डअळीबाबत केंद्राकडून राज्य सरकारला एक रुपयाही आणू शकले नाही यावरून या सरकारची पत कळाली असा जोरदार चिमटा मुंडेंनी काढला.

COMMENTS