निवडणूकपूर्व अंतिम अर्थसंकल्पातही मोदी सरकारचे सपशेल अपयश – धनंजय मुंडे

निवडणूकपूर्व अंतिम अर्थसंकल्पातही मोदी सरकारचे सपशेल अपयश – धनंजय मुंडे

मुंबई – मोदी सरकारनं आज सादर केलेला अर्थसंकल्प ‘चुनावी जुमला’ असून गेल्या चार वर्षातली पापं धूवून टाकण्यात हा अर्थसंकल्प सपशेल अपयशी ठरला आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारचा ‘अंतिम’ अर्थसंकल्प आहे, अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंबंधीत कोणतीच घोषणा नाही. दीडपट हमीभाव देण्यासाठी तरतूद नाही. भावांतर योजना नाही. नाशवंत पिकासाठी कोणतेच संरक्षण नाही. उलट महिन्याला ५०० रूपये देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे काम या सरकारने केले आहे.

आजचा अर्थसंकल्प म्हणजे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनाच खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे बजेट आहे की सुरज बडजात्याचा हॅप्पी एंडिंग चित्रपट? गेल्या साडेचार वर्षात जाहीर केलेल्या योजनांची अजून अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे जनतेचा रोष सरकारवर कायम राहणार असल्याचे मुंडे म्हणाले.मोदी सरकारची शेतकऱ्यांबद्दलची, मध्यमवर्गाबद्दलची अनिती याआधीच्या चार अर्थसंकल्पात सातत्याने दिसून आली आहे. यंदाच्या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पाकडून अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

बहुतांश बँकांमध्ये बचत खात्यात किमान 3 हजार रुपये शिल्लक ठेवावी लागते.  किमान शिल्लक नसल्यास बँक दंड आकारते, अशा स्थितीत गरीब शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेल्या दरमहा 500 रुपयांचा त्याला उपयोग होण्याऐवजी दंड बसण्याचीच शक्यता अधिक आहे. आर्थिक दुर्बलांची व्याख्या वार्षिक 8 लाख रुपये उत्पन्नापर्यंत वाढवल्याने मध्यमवर्गीयांना तिथपर्यंत आयकर सवलत मिळणं अपेक्षित होतं.

उज्वला योजनेंतर्गत  6 कोटी जोडण्या दिल्याचा दावा करताना या 6 कोटी जोडण्यांपैकी किती जणांनी पुन्हा 800 रुपयांचा सिलेंडर खरेदी केला याचीही आकडेवारी दिली पाहिजे होती. सरकारचा संपूर्ण अर्थंसंकल्प हा ‘खयाली पुलाव’ आहे. घोषणांचा सुकाळ आणि शब्दांच्या बुडबुड्यांपलिकडे यातून जनतेच्या हाती काहीही लागणार नाही.

मूळात केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार हे कधीच अर्थसंकल्पाला बांधिल राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या घोषणा आणि दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत असं त्यांच्यावर बंधन नाही आणि ती पाळली जाण्याची जराही शक्यता नाही. मोदी सरकारने हा अर्थसंकल्प ‘चुनावी जुमला’ करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला आहे. मोदींच्या खोट्या आश्वासनांच्या पूर्वानुभवामुळे जनता आता त्यांच्या कुठल्याच शब्दावर विश्वास ठेवायला तयार नाही.निवडणुकीनंतर आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सादर होणारा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थानं, शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा असेल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी दिला.

COMMENTS