मुंबई – महागाई रोखण्यासाठी, मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी, देशावर असलेले मंदीचे मळभ दूर करण्यासाठी, उद्योगांना उभारी देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोणत्याही भरीव उपाययोजना न करता केवळ घोषणांचा पाऊस पाडणारा, परंतु ह्या घोषणा पूर्णत्वास नेण्यासाठी पैसा कुठून येईल याचे उत्तर मात्र केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणातून मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
देशात अभूतपूर्व मंदीचे सावट आहे, सरकारकडून जाणीवपूर्वक धर्मा धर्मात फूट पाडण्याचे कारस्थान केले जात आहे. त्यातच आज मोदी सरकारने बजेट सादर केले.
अर्थ मंत्र्यांवर आणि त्यांनी केलेल्या घोषणांवर विश्वास कसा ठेवायचा? कारण 6 वर्ष त्यांचेच सरकार आहे पण हे सरकार भांडवल निर्मिती, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धी करू शकले नाही; आर्थिक सर्वेक्षण अहवालाने मोदी सरकारला अक्षरशः उघडं पाडले !
2019-20 मध्ये भांडवल निर्मिती, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धी दर 10 वर्षाच्या तळाला 2.54 टक्के झाला आहे. भांडवल निर्मिती करू शकला नाही, रोजगार देऊ शकला नाही आणि आर्थिक वृद्धी करू शकला नाही, हा यांचा विकास आहे अशी टीकाही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
दरम्यान अर्थसंकल्प सादर करताना पंतप्रधान मोदी किंवा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये कसलाच आत्मविश्वास दिसून आला नाही, कारण या सरकारकडे योजना अंमलात आणण्यासाठी पैसाच नाही, त्यामुळे आता IDBI, LIC, AIR INDIA सारख्या कंपन्या विकायला काढल्या आहेत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू यासारख्या धूळफेक करणाऱ्या योजनांचा पाढा अर्थमंत्र्यांना वाचावा लागला, अनुसूचित जाती आणि जमातीची तरतूद वाढल्याचे दाखवले असले तरी मागच्या वर्षापेक्षा ही वाढ 40 टक्क्याने कमी आहे. त्यामुळे दिशाभूल करणारा, भारताची निराशा करणारा भारताच्या अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा असा हा अर्थसंकल्प आहे, कुणीही याचे स्वागत करणार नाही, नेहमीप्रमाणे मोदी सरकारने देशवासीयांची घोर निराशा केली आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS