जालना – दुष्काळ जाहीर केल्यानंतर उपाययोजना करण्याची जबाबदारीही सरकारची असते. राज्य सरकारने १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले मात्र २५ दिवस झाले तरी सरकारतर्फे कोणतीही उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर केला पण उपाययोजना कोण करणार असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. धनंजय मुंडे आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी आज जालना जिल्ह्यातील दुष्काळजन्य भागाचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाण्याअभावी जळालेल्या फळबागा, वाळलेल्या उसाची पाहणी केली तसेच यावेळी त्यांनी शेतक-यांशीही चर्चा केली.
दरम्यान मुख्यमंत्री जागोजागी बैठका घेत आहेत मात्र जिल्हा प्रशासनाला त्यांनी कोणतेही आदेश दिले नाहीत. आज दुष्काळामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. फळबागा जिवंत ठेवण्यासाठी सरकार काहीच करत नाही असा आरोप मुंडे यांनी केला. उसाच्या पिकाला आणि फळबागांना १ लाख हेक्टरी मदत मिळावी, इतर पिकांना ५० हजार हेक्टरी मदत मिळावी, शेतकऱ्यांचे वर्षभराचे वीज बिल सरकारने द्यावे, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी सरकारने भरावी अशी मागणी मुंडे यांनी केली. दुष्काळ जाहीर केला म्हणजे जबाबदारी संपली असं सरकारला वाटत असेल तर ते चुकीचं आहे असे खडेबोलही त्यांनी सरकारला सुनवले.
COMMENTS