सरकारला महाराष्ट्रातील संकटाशी काही देणं घेणं नाही – धनंजय मुंडे

सरकारला महाराष्ट्रातील संकटाशी काही देणं घेणं नाही – धनंजय मुंडे

मुंबई – महाराष्ट्रातील संकटाशी या सरकारला काही देणं घेणं नाही यांना फक्त मतं आणि मतं पाहिजेत व पुन्हा मीच मुख्यमंत्री हेच सांगायचं आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने पुरग्रस्तांसाठी ५० लाखाचा धनादेश दिल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानभवनातील वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधला.

इथं माणसं मरत आहेत. १४ – १४ दिवस पोटात अन्नाचा कण नाही. लहान लेकराला दुध प्यायला नाही. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाजनादेश यात्रा काढण्याऐवजी तिथे जावून बसण्याची आवश्यकता आहे. तिथे बसून प्रशासन हलवून आठ दिवसाच्या आत पुर्ववत स्थिती आणण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.राज्य सध्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. मात्र भाजपने त्यांची महाजनादेश यात्रा पार्ट २ सुरू करण्याचा बेत आखला आहे. लोकांच्या वेदनेशी यांना घेणं देणं नाही. यांना फक्त पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडून यायचं आहे. असं मुंडे यांनी म्हटलं आहे.

पाण्याखाली असणाऱ्या सर्व पिकांना तसेच ऊस, आंबा, काजू इतर फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये, भाताला ५० हजार, नाचणीला ४० हजार अनुदान द्यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत जाहीर करावी. पूरग्रस्त बांधवांना उठून उभे करण्यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे. मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मागण्यांबाबत तात्काळ पूर्तता करावी. मुख्यमंत्र्यांनी पूर्तता केली नाही तर लोकांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागेल. पूरपरिस्थिती असताना सरकारमधले मंत्री बेजबाबदार वागत होते. या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत नाही असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS