23 फेब्रुवारीला परळीत राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा – धनंजय मुंडे

23 फेब्रुवारीला परळीत राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा – धनंजय मुंडे

बीड – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीची राज्यस्तरीय दुसरी संयुक्त प्रचार सभा शनिवार दि.23 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ (जि.बीड) येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या भव्य आणि ऐतिहासिक संयुक्त प्रचार सभेतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा समारोप होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परळी वैद्यनाथ शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात होणार्‍या या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेसतर्फे महाराष्ट्राचे प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे व राज्य सभेतील विरोधी पक्षनेते खा.गुलाम नबी आझाद यांनाही निमंत्रित करण्यात आले असून, या दोघांपैकी एक तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खा.सौ.सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, पी.आर.पी. राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोंगेंद्र कवाडे यांच्यासह प्रदेश पातळीवरील सर्व नेते उपस्थित राहणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पक्षाचे आजी माजी, आमदार, खासदार, पदाधिकारी, काँग्रसचे स्थानिक पातळीवरील नेते मंडळी यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच या सभेस 1 लाख लोकांची उपस्थिती राहिल व या सभेतून केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यातही परिवर्तनाचा संदेश देणारी ही ऐतिहासिक सभा असेल असा विश्‍वास श्री. मुंडे यांनी व्यक्त केला.

केंद्र व राज्यातील सरकारने 5 वर्ष जनतेला फसवले आहे. या फसवणुकीचा रोष जनता या सभेला उपस्थित राहुन व्यक्त करेल, आगामी निवडणुकीत मतपेटीतून ही व्यक्त होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरसिंह पंडित, उषाताई दराडे, जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, ज्येष्ट नेते रविंद्र क्षीरसागर, युवक नेते अक्षय भैय्या मुदंडा, सतिश शिंदे, महेंद्र गर्जे, बबन गवते, जयसिंग सोळंके, शेख महेबुब, अविनाश नाईकवाडे आदी उपस्थित होते.

फुल और काटे चित्रपटासारख्या फोटोशिवाय जिल्ह्याला काही मिळाले नाही

‘फुल और काटे` या हिंदी चित्रपटात अजय देवगण ज्या प्रमाणे दोन बुलेटवर उभा टाकलेला पाहिलेला मिळतो, तसाच रेल्वेच्या पटरीवर उभ्या टाकलेल्या पालकमंत्री यांच्या फोटोशिवाय जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. जिल्ह्यात सिंचनाचे, उद्योगाचे आणि ऊसतोड कामगारांचे कोणते प्रश्‍न सोडवले याचे उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.

COMMENTS