बीड – जिल्ह्यातील सर्वच बँकांनी पीककर्ज वाटपाचा वेग वाढवावा, किरकोळ कारणांवरून बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये; सीबील क्रेडिट कडे सहानुभूतीपूर्वक पाहिले जावे यासह उद्या (दि.१२) पासून लागू होत असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम पीककर्ज वाटपावर होऊ नये यादृष्टीने काम करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केवळ उद्दिष्टपूर्तीचा विचार न करता कर्जमाफीचा लाभ मिळवून पात्र असलेले व नव्याने पात्र असलेले अशा सर्वच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात यावे असे यावेळी मुंडे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व प्रमुख बँकांच्या प्रमुख अधिकारी/प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, शिवाजी सिरसाट, यांसह जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
नवीन पीककर्ज प्रस्तावांसाठी आठवड्यातील एक दिवस ठरवून द्यावा, तसेच सध्या प्रलंबित असलेली प्रकरणे लवकर मार्गी लावावीत, उद्या (दि.१२) पासून जिल्ह्यातील काही शहरांमध्ये होत असलेल्या लॉकडाऊन मध्ये बँकांची ग्राहक सेवा केंद्रे तसेच बँक कर्मचाऱ्यांनी स्वतः कर्ज प्रस्ताव व कागदपत्रे संकलित करावीत जेणेकरून लॉकडाऊनचा परिणाम पीककर्ज प्रक्रियेवर होणार नाही, अशा सूचना मुंडे यांनी या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
पीक कर्ज मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना खाजगी फायनान्स चे नाहरकत मागत असलेल्या बँकांनी असे करणे तात्काळ थांबवावे, तसेच कोणतीही बँक याबाबत सहकार्य करत नसल्यास त्यांना तात्काळ नोटिसा द्याव्यात. शेतकऱ्यांचे सीबील क्रेडिट बघताना कर्ज प्रकरणाचा अभ्यास करून शेतकऱ्यांचा सध्याच्या परिस्थितीत सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही यावेळी मुंडे म्हणाले.
कोविड परिस्थिती व उपाययोजनेचा घेतला आढावा, हा लॉकडाऊन नव्हे तर ब्रेकडाऊन ठरावा
दरम्यान जिल्ह्यातील सध्या सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट, त्यासाठी आवश्यक किट, त्याचबरोबर उपलब्ध बेड, तसेच नव्याने आदेशित केल्याप्रमाणे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच आयसोलेट करणे व त्याबाबतची खबरदारी या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
यावेळी काही शहरात लागू केलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन हा कोरोनाची साखळी तोडणारा ब्रेकडाऊन ठरावा असे नियोजन करावे, त्यासाठी अधिकाधिक चाचण्या करून निदान होणे आवश्यक असून त्यासाठी लागणाऱ्या किटची उपलब्धता व अन्य बाबींवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत, अंबेजोगाई येथील लोखंडी सावरगाव हे आणखी एक हजार बेड क्षमता असलेले रुग्णालय सज्ज झाले असून, वीज जोडणीचे काम पूर्ण होताच तेही कोविड रुग्णांसाठी वापरता येईल अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
COMMENTS