बीड, परळी वै. – भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने मी आनंदी असून पक्षास यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पक्षातील माझ्या सारख्या तरुणांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या समवेत आयुष्यातील मोठा काळ घालवत पक्षाला बळ दिले, अनेक आमदार – खासदार निवडून आले, पक्ष संघटन वाढवले परंतु त्यांच्या सारख्या लोकनेत्यावर भाजपने व्यक्तिगत व राजकीय असा दुहेरी अन्याय केला व तो अजिबात योग्य नव्हता असेही यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.
ज्येष्ठ नेते मा. एकनाथजी खडसे साहेब यांचा @NCPSpeaks मध्ये प्रवेश हा निश्चितच पक्षाला बळकटी व आनंद देणारा आहे. माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. मा. नाथाभाऊ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत. @EknathGKhadse pic.twitter.com/nE19uXSxvc
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 23, 2020
सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून नाथाभाऊंची ओळख असून त्यांच्या पूर्वीच्या पक्षात असताना मी त्यांच्या सोबत काम देखील केलेले आहे. ४० वर्षांपेक्षा प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्द असलेल्या नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाने पक्षाला नक्कीच बळ मिळेल तसेच माझ्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या या अनुभवाचा फायदा होईल असेही मुंडे म्हणाले.
वडिलांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त मी परळीत, अन्यथा स्वागताला गेलो असतो
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने भाजपचा खान्देशातील मोठा गड ढासळला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाथाभाऊना नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला. दरम्यान माझे वडील स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त पारंपरिक भागवत कथा सप्ताह सुरू असल्यामुळे मी परळीत आहे, अन्यथा मी सुद्धा नाथाभाऊंच्या स्वागत सोहळ्यास व्यक्तिशः उपस्थित राहिलो असतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
COMMENTS