मुंबई – सहा महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना आणि आदिवासींना दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नसल्याने हा शेतकरी सरकारवरील रोष व्यक्त करत आहे. म्हणून कुंभकर्णासारखं झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्यासाठी ४५ किलोमीटरची पायपीट करुन शेतकरी विधानभवनावर धडकला आहे. आत्ता तरी हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागं होणार आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे.
विधान परिषदेत आज कामकाज सुरू सुरू होताच धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात आरक्षणासोबत दुष्काळाचा विषय गंभीर बनला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कित्येक किलोमीटर पायपीट करुन शेतकरी विधानभवनावर धडकत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची अशी अवस्था याआधी कधीच झालेली नव्हती.आदिवासी शेतकऱ्यांना ६ महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळले नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.
साडेपाच लाख शेतकरी सरकारी मदतीपासून वंचीत आहेत. आपला आक्रोश मांडण्यासाठी हा शेतकरी मोर्चा निघाला आहे तो या सरकारला शेवटचा धडा शिकवण्यासाठीच आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत ४१ जणांनी आपले जीव गमावले. त्यांना दहा लाख व शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन या सरकरने दिले होते त्याची परिपूर्तता झाली का याचे उत्तर सरकारने द्यावे अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी स्थगनप्रस्तावाद्वारे केली.विधान परिषदेत मागास आयोगाचा अहवाल पटलावर का घेतला जात नाही? असा सवाल करतानाच धनगर आरक्षणाचा टीसने दिलेला अहवाल आजच्या आज सदनासमोर मांडवा अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी सभागृहात केली
COMMENTS